मनोज सातवी, प्रतिनिधी
वाडा तालुक्यातील नेहरोली गावात 30 ऑगस्ट रोजी बंद घरात एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मुकुंद राठोड (70), त्यांची पत्नी कांचन राठोड (69) आणि मुलगी संगीता राठोड (51) यांची निर्दयीपणे हत्या करून त्यांचे मृतदेह घरातील पेटीत आणि बाथरूममध्ये लपवण्यात आले होते आणि घराला बाहेरून कुलूप लावलेलं होतं. दरम्यान या तिहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना यश आलं असून राठोड कुटुंबीयांकडे असलेल्या भाडेकरु आरिफ अन्वर अली याने पैशाच्या हव्यासापोटी घरमालक, त्याची पत्नी आणि मुलीची लोखंडी हातोड्याने निर्दयीपणे हत्या केल्याचं उघड झालं आहे.
आरोपी भाडेकरू आरिफ अन्वर अली याला त्याच्या उत्तर प्रदेशातील गावी जायचे होते. घर मालकाकडे पैसे आणि दागिने असतील, त्याची चोरी करून गावी पसार व्हायचा प्लान आखून त्याने चोरीच्या उद्देशाने या तिघांचीही डोक्यात लोखंडी हातोडा घालून निघृण हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. तसेच, त्याने घरातील काही रक्कम आणि घरातील चांदीच्या 4 कॉइनची चोरी करून उत्तर प्रदेशात पसार झाला होता.
नक्की वाचा -बाप्पा येण्याचा आनंद, पण घरातील लक्ष्मी गेली सोडून; कुटुंबावर शोककळा!
दरम्यान, गुन्हा उघडकीस आल्यानंतर वाडा पोलिसांनी ठाणे येथून आणलेल्या श्वान पथकाने आरोपी भाडेकरू राहत असलेल्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीपर्यंत माग काढला. त्यावेळी भाडेकरू आरिफ अन्वर अली घरातून गायब असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मग काढत उत्तर प्रदेशातून त्याच्या मुसक्या आवळल्या.