रिझवान शेख, ठाणे
Thane News: जलद नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका फसवणूक प्रवृत्तीच्या टोळीचा पर्दाफाश कापुरबावडी पोलिसांनी केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून खेळण्यातील नोटा व सोन्यासारखी दिसणारी बनावट बिस्कीटे असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. तर आरोपीचा साथीदार मात्र संधी साधून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
फिर्यादी नितेश हरिश्चंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इसमाने त्यांना रु. १ लाख दिल्यास त्याच्या बदल्यात केवळ तीन आठवड्यांत ३ लाख रुपये परत देण्याचे आमिष दाखवले. या संशयास्पद व्यवहाराबाबत फिर्यादींना शंका आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून कापुरबावडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८०६/२०२५, बी.एन.एस. कलम ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
Beed News: पती, दारू अन् तो! जरांगेंच्या मर्डरचा प्लॅन, आरोपीची पत्नी आली समोर, धक्कादायक खुलासा
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. आरोपी दि. ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २ वाजता ग्लोबल हॉस्पिटलजवळ, साकेत-बाळकुम रोड, ठाणे येथे नोटा घेवून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने अत्यंत शिताफिने त्या ठिकाणी कारवाई केली. आरोपी फिर्यादींना खऱ्या नोटांच्या बदल्यात खेळण्यातील नोटा देत असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. मात्र त्याचा साथीदार संधी साधून घटनास्थळावरून फरार झाला.
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून तसेच त्याच्या घराची झडती घेतल्यावर मोठ्या प्रमाणात बनावट माल सापडला. यामध्ये ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडल स्वरूपात आणि “भारतीय बच्चो का बँक” असे लिहिलेल्या खेळण्यातील नोटा एकूण ३६० बंडल,सोन्यासारखी दिसणारी ३८ पिवळ्या धातूची बिस्कीटे,काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अटक आरोपीचे नाव संजयकुमार पकौडीलाल भारती (वय ४३ वर्षे, रा. यशवंत चाळ, डॉ. श्रीकृष्ण हरी यांची खोली, पदमानगर, भाजी मार्केट रोड, धामणकर नाका, भिवंडी) असे असून तो नोकरी करत असल्याचे सांगितले आहे.
प्राथमिक तपासात उघड झाले आहे की आरोपी व त्याचे साथीदार हे लोकांना कमी मुदतीत अधिक पैसे परत देण्याचे खोटे आश्वासन देऊन त्यांच्या विश्वासात घेत असत. त्यानंतर बळी व्यक्तीकडून रोख रक्कम घेऊन त्यांना खेळण्यातील नोटांच्या बंडलांनी फसवत असत. या बंडलांच्या वर आणि खाली दोन-दोन खऱ्या नोटा ठेवून संपूर्ण बंडल खऱ्या नोटांचे असल्याचा भास निर्माण केला जात असे.
जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत 12 हजार 500 रूपये प्रति किलो, कुठे मिळतो माहित आहे का?
तसेच आरोपी लोकांना “स्वस्तात सोने मिळवून देतो” असे सांगून त्यांच्याकडून रक्कम घेऊन खोटे सोने देत असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. कापुरबावडी पोलिसांनी सांगितले की, अटक आरोपी व त्याचे साथीदारांनी याच पद्धतीने आणखी काही लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपीच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी पथक कार्यरत आहे.