Best Deal TV Fraud: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी 60.40 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा संबंध 2015 मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या 'बेस्ट डील टीव्ही' या कंपनीशी आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात लूकआउट नोटीस जारी केली आहे.
काय आहे प्रकरण?
दीपक कोठारी या व्यावसायिकाने या प्रकरणार तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 'बेस्ट डील टीव्ही' या टेलिशॉपिंग व्यवसायाच्या विस्तारासाठी 2015 ते 2023 या काळात त्यांच्याकडून 60 कोटी रुपये घेतले. मात्र, हे पैसे व्यवसायाऐवजी त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी वापरण्यात आले, असा आरोप कोठारी यांनी केला आहे. तसेच, हे कर्ज असल्याचे सांगून कर बचतीसाठी नंतर गुंतवणुकीत रूपांतरित करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कोठारी यांनी असाही दावा केला आहे की, शिल्पा शेट्टीने एप्रिल 2016 मध्ये त्यांना गुंतवणुकीची लेखी हमी दिली होती. परंतु, काही महिन्यांतच तिने कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. कंपनीच्या विरोधात 1.28 कोटी रुपयांचे दिवाळखोरीचे प्रकरण सुरू असल्याची माहितीही त्यांना नंतर समजली.
( नक्की वाचा : गायक राहुल देशपांडेनंतर ‘या' अभिनेत्रीचा घटस्फोट; लग्नाच्या अवघ्या 5 वर्षांत संपला संसार )
काय होती 'बेस्ट डिल' कंपनी?
'बेस्ट डील टीव्ही' ही सेलिब्रिटी-आधारित टेलिशॉपिंग वाहिनी म्हणून मार्च 2015 मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी, शिल्पा शेट्टीचे माजी प्रियकर आणि बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारही या कंपनीत भागीदार होता. या व्यवसायात शिल्पा आणि राज कुंद्रा यांची 63% हिस्सेदारी होती, तर अक्षय कुमारकडे 8% आणि तक्रारदार कोठारी यांच्याकडे 26% हिस्सा होता. 'कॅश ऑन डिलिव्हरी' (COD) मॉडेलवर चालणाऱ्या या कंपनीला 2016 मधील नोटाबंदीचा मोठा फटका बसला. त्यामुळे, अवघ्या 18 महिन्यांत कंपनीने सुमारे 100 कोटी रुपयांचे नुकसान सोसले.
डिसेंबर 2016 मध्ये राज कुंद्राने कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आणि नोटाबंदीमुळे कंपनीला फटका बसल्याचे कारण दिले. कंपनी बंद पडल्यानंतरही कोठारी यांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत, ज्यामुळे त्यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला. या प्रकरणाची आता पोलीस कसून चौकशी करत आहेत.