Kalyan Crime News Latest : शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या सुप्रसिद्ध फटका पॉइंटवर एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला कल्याण जीआरपीने अटक केली आहे.इमरान इराणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपीला पकडताना त्याने पोली कर्मचाऱ्यावर हल्ला केला. मात्र आरपीएफ जवानाच्या मदतीने त्याला जेरबंद करण्यात यश आलं.
उत्तर प्रदेशकडे जाणारी अंत्योदय एक्स्प्रेस कल्याणहून रवाना झाल्यानंतर शहाड रेल्वे स्थानक ओलांडून पुढे जात होती.यावेळी ट्रेनच्या दरवाजात उभा असलेला एक प्रवासी मोबाईलवर बोलत होता.शहाड-आंबिवलीदरम्यानचा परिसर हा ‘फटका पॉइंट' म्हणून ओळखला जातो.येथे यापूर्वीही प्रवाशांना फटका मारून मोबाईल आणि मौल्यवान वस्तू लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.त्यामुळे या ठिकाणी पोलिसांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
सुटकेसाठी आरोपीने त्यांच्यावरही हल्ला केला
ट्रेन फटका पॉइंटजवळ पोहोचताच खाली दबा धरून बसलेल्या आरोपीने प्रवाशाच्या हातावर बांबूने जोरात फटका मारला.त्यामुळे मोबाईल खाली पडला आणि आरोपी तो घेऊन पळण्याचा प्रयत्न करू लागला. हा संपूर्ण प्रकार तेथे तैनात असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आला.जीआरपीचे पोलीस कर्मचारी अक्षय पाटील यांनी तत्काळ आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले. मात्र सुटकेसाठी आरोपीने त्यांच्यावरही हल्ला केला.याचवेळी तेथून जात असलेल्या आरपीएफ जवान अमित कुमार यांनी प्रसंगावधान दाखवत धाव घेऊन मदत केली. दोघांच्या संयुक्त कारवाईत आरोपी इमरान इराणी याला पकडण्यात यश आले.
नक्की वाचा >>Pune News : पुणे रेल्वे स्थानकाजवळ सुरु होता भयानक प्रकार, DRI ला टीप मिळताच खेळ खल्लास, नेमकं काय घडलं?
एक प्रवासी रेल्वेतून खाली पडला अन्..
यानंतर कल्याण जीआरपीने आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.इमरान इराणी याने यापूर्वी अशाच प्रकारचे किती गुन्हे केले आहेत,याचा तपास सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे,याच फटका पॉइंटवर याआधी घडलेल्या एका घटनेत मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी रेल्वेतून खाली पडला होता.
त्या भीषण अपघातात त्याला दोन्ही पाय गमवावे लागले होते.त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे.या कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असून फटका पॉइंटवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी आणखी कडक उपाययोजना कराव्यात,अशी मागणीही पुढे येत आहे.