प्रसाद पाटील, प्रतिनिधी
Mahad News : महाड एमआयडीसी हद्दीमध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांनी आता देवाची मंदिरं टार्गेट केली आहेत. काही दिवसापूर्वी पारमाची येथील मंदिरातून चोरट्यांनी पितळेच्या घंटा चोरून नेल्या होत्या, मात्र त्या चोरांचा अद्यापही तपास लागलेला नाही. महाड तालुक्यातील खरवली - काळीज ग्रामपंचायत हद्दीतील मौजे ढालकाठी येथील दत्त मंदिरातील दानपेटी चक्क काळ नदीत पात्रामध्ये सापडली आहे.
मौजे ढालकाठी येथे काही वर्षापासून दत्त मंदिर उभारण्यात आले आहे. या दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती निमित्त मोठा उत्सव साजरा होतो. अनेक भाविक भक्त या मंदिरामध्ये दर्शनासाठी ये-जा करीत असतात. दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना मंदिरासाठी दान करता यावे याकरिता मंदिरातील आयोजक आणि पुजारी यांस कडून मंदिरातील दत्तमूर्ती समोर दानपेटी ठेवण्यात आली होती. दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भाविक भक्त या दानपेटी मध्ये आपल्या मनाने दान करून पूजेचा महाप्रसाद घेत असत. मात्र या दत्त मंदिरातील दानपेटी चार-पाच दिवसापासून गायब झाली आणि मोठा चमत्कार झाला.
नक्की वाचा - Solapur News : भिशी सुरू केली अन् जवळपास 3 कोटी खिशात, दाम्पत्याचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले!
गायब झालेली दानपेटी चक्क बराच काळ नदीच्या पात्रात आढळली. गावातील स्थानिक ग्रामस्थ व पुजारी यांना याबाबतथोडासाही थांगपत्ता लागला नाही. मात्र अचानक चार दिवसानंतर मंदिरासमोर असलेली दानपेटी नदीपात्रात कशी आढळली यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. मंदिरासमोर ठेवण्यात आलेली दानपेटी जवळपास दोन-तीन वर्ष बंद होती त्यामुळे या दानपेटीमध्ये भक्तांनी किती दान केले होते याचा सुगावा मात्र लागू शकला नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दानपेटी गायब होऊन जवळपास चार ते पाच दिवस झाले तरीदेखील ग्रामस्थ आणि पुजारी यांनी कोणतीही तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल केली नाही. तसेच अचानक मंदिरातील दानपेटी नदीपात्रात रिकाम्या अवस्थेत सापडल्यामुळे दानपेटी ही चोरीला गेली असावी अशी उलट सुलट चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.