प्रतीक्षा पारखी, पुणे
पुण्यामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीचे भरदिवसा तिच्या कार्यालयातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर पुढील दोन दिवस तिला गाडीमध्येच डांबून ठेवलं होतं. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन पतीसह 3 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ऑफिसमधून गाडीपर्यंत तिला फरफटत नेण्यात आले. यानंतर दोन दिवस तिला वारंवार भुलीचं इंजेक्शन देत, गाडीतच डांबून ठेवले. अखेर एका तरुणाची मदत घेत तिने पोलिसांशी संपर्क साधला. सुमित शहाणे असं आरोपी पतीचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मंचरमधील या दाम्पत्याचं ऑगस्ट 2023 मध्ये लग्न झालं होतं. परंतु लग्नाच्या आठवडाभरात पतीने वेगवेगळ्या मागण्या सुरु केल्या. या मागण्या मान्य नसल्यामुळे या पत्नीने सुमितपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने थेट मुंबई गाठली. तिथे काही महिने मैत्रिणीकडे राहिली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ती नोकरीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये आली होती. एका बांधकाम व्यावसायिकाकडे ती नोकरी करत होती याची माहिती सुमितला मिळाली.
(नक्की वाचा - इंदापूरमधील 3 कॅफेवर पोलिसांची धाड; आत सुरु असलेला प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला)
त्यानंतर सुमितने कट रचला आणि 19 जूनला तो आई आणि चालकासोबत वाकडमध्ये पोहोचला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याने पत्नीला ऑफिसमधून बाहेर आणलं. पत्नीचा विरोध असूनही तिला फरफटत आणून गाडीत बसवलं. त्यावेळी पीडित महिलेचा मित्रही जबरदस्तीने गाडीत बसला. गाडी मंचरच्या दिशेने निघाली होती. थोडं पुढे गेल्यावर सुमितने पत्नीच्या मित्राला कानशिलात लगावली आणि त्याला गाडीतून बाहेर ढकलून दिलं.
प्रवासादरम्यान सुमितने पत्नीला भुलीचं इंजेक्शन दिलं. यानंतर गाडीतच डांबून ठेवलं. शुद्धीवर आल्यावर वारंवार भुलीच इंजेक्शन दिलं, असा आरोप पत्नीने केला आहे. अखेर 20 जूनच्या दुपारी पत्नीने सुमितला विश्वासात घेतलं. सांगशील त्या कागदपत्रांवर सही करते, असं तिने त्याला सांगितले. यानंतर सुमितने गाडी मंचर परिसरात आणली.
(नक्की वाचा - तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णचं राहीलं, शेतकऱ्याच्या लेकीचं टोकाचं पाऊल)
मात्र माझी भूल अद्याप उतरली नाही, असा बहाणा पत्नीने केला. यानंतर ते एका मंदिरात थांबले. पत्नीने संधी साधत एका तरुणाला खुणावत मदतीची मागणी केली. तरुणालाही गडबड वाटल्याने त्यानेहा तत्काळ मंचर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलीस तातडीने मंदिरात पोहचले आणि पीडित पत्नीची सुमितच्या तावडीतून सुटका झाली. महिलेने पोलिसांना सगळा घडलेला प्रकार सांगितला. तिने पती, आई आणि चालकावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अपहरण ते सुटका या दरम्यान बेशुद्ध असताना नेमकं काय-काय घडलं, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.