Dombivli Crime News Today : रस्त्यात गाडी उभी करून गप्पा मारत असलेल्या तिघांना बाजूला व्हायला सांगितलं, त्यानंतर संतापलेल्या आरोपींनी कार चालक आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिम येथील सत्यवान चौक परिसरात घडली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी प्रितेश उर्फ राम्या म्हात्रे,सचिन म्हात्रे आणि योगेश सुर्वे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,डोंबिवली पश्चिम येथील सत्यवान चौक परिसरात तीन तरुण रस्त्यामध्ये गाडी उभी करून गप्पा मारत होते. यावेळी अमित पाटील हे कारचालक त्या ठिकाणी आले. त्यांनी संबंधित तरुणांना गाडी बाजूला करण्यास सांगितले. मात्र,त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर अमित पाटील यांनी दोन ते तीन वेळा हॉर्न वाजवला.
नक्की वाचा >> Asha Bhosle Death Live Update: आशा भोसले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहीली आदरांजली, म्हणाले...
रागाच्या भरात मित्रांवर केला मोठा हल्ला
याचा राग आल्याने तिघांनी संतापाच्या भरात कार चालक अमित पाटील आणि त्यांचा मित्र यश म्हात्रे याच्यावर प्राणघातक हल्ला केला.रस्त्यावर पडलेले दगड उचलून त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली.तसेच कारची तोडफोडही केली. या हल्ल्यात अमित पाटील आणि यश म्हात्रे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोपींपैकी प्रितेश उर्फ राम्या म्हात्रे आणि सचिन म्हात्रे यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात या तरुणांची दहशत असल्याचेही बोलले जात आहे.अटक केलेल्या तिघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.