Titwala News : सोशल मीडियावर मैत्री करून नंतर ब्लॅकमेलिंग केल्याचे अनेक प्रकार वारंवार घडत असतात. कल्याण जवळच्या टिटवाळामध्ये देखील असाच एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. टिटवाळ्यातील तरुणीनं प्रियकराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणीने तिने प्रियकराला व्हिडिओ कॉलवर असतानाच आत्महत्या केली.
या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी ऋतिक रोहणे नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याने इतरही काही तरुणींना अशाच प्रकारे फसविले असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपानंतर पोलिसांनी त्यापद्धतीनं तपास सुरु केला आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याण जवळच्या टिटवाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. तीन दिवसांपूर्वी एका 23 वर्षीय तरुणीने घराच्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांनी तिला तातडीने जवळच्या गोवेली शासकीय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुर्दैवाने, या प्रकरणात शवविच्छेदन न करताच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
( नक्की वाचा : Kalyan News : 'कंबरडं मोडलं!' कल्याण-डोंबिवलीत खड्ड्यांचे साम्राज्य, आमदाराच्या घरासमोरही बिकट अवस्था )
अंत्यसंस्कारानंतर नातेवाईकांनी तरुणीचा मोबाईल तपासला असता, त्यांना सत्य समोर आले. तरुणीचा प्रियकर, ऋतिक रोहणे, तिच्याशी इंस्टाग्रामवर ओळख करून मैत्री केली होती. त्याने वेगवेगळ्या बहाण्याने तिचे दागिने घेतले होते. पीडित तरुणी ऋतिककडं तिचे दागिने परत मागत होती. पण, ऋतिक तिला ब्लॅमेकल करत होता. तो . तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो तिला त्रास देत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून तिने अखेर टोकाचे पाऊल उचलले.
आत्महत्येपूर्वी तिने ऋतिकला व्हिडिओ कॉल केला होता, आणि याच व्हिडिओ कॉलदरम्यान तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
आणखी काही मुलींचीही फसवणूक?
या प्रकरणातील आरोपी ऋतिक रोहणेने अशा प्रकारे अनेक मुलींना फसवले आहे, असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला. त्यांच्या मुलीसोबत जे घडले, ते इतर कोणासोबत घडू नये, यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी ऋतिक रोहणेला ताब्यात घेतले आहे. त्याने या पद्धतीनं किती मुलींची फसवणुक केली आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.