वाळू चोरीचं चित्रीकरण केल्याच्या संशयावरून रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम यांच्यावर वाळू चोरांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (7 जून) रत्नागिरीत घडली आहे. गेडाम यांच्यावर वाळू चोरांनी फावड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण गेडाम या कराटे नॅशनल चॅम्पियन असल्याने त्यांनी हल्लेखोरानाच चोप दिला. शुक्रवारी सकाळी गेडाम या मुरूगवाडा-पांढरा समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या, त्यावेळी ही घटना घडली. दरम्यान गेडाम यांनी याबाबत शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कराटे किकद्वारे हल्ला परतवून लावणाऱ्या गेडाम यांच्या धाडसाचं सध्या कौतुक होत आहे.
(नक्की वाचा: धक्कादायक! गुदद्वारात कॉम्प्रेसरने भरली हवा, लहान मुलासोबत घडला भयंकर प्रकार)
नेमकं काय झालं?
उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी या प्रकाराबाबत सांगितलं की, "मी सकाळी समुद्रकिनाऱ्यावर मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी मी किनाऱ्यावरून समुद्राचे चित्रीकरण करत होते. याचवेळी येथे वाळूचे अवैधरित्या उत्खनन सुरू होते. ट्रक, बोलेरो पिकअप गाड्यांमध्ये वाळू भरली जात होती. त्याचवेळी एक व्यक्ती माझ्याजवळ येऊन म्हणाला की आमचे फोटो का काढत आहात? त्याला म्हटलं की मी फक्त समुद्रकिनाऱ्याचे फोटो काढत आहे. त्यानंतर मी तिथून निघताना एक गाडी माझ्याजवळ आली, त्यातून दोन लोक उतरली आणि मला म्हणाले तुमचा मोबाइल आम्हाला द्या. कारण तुम्ही आमच्या गाडीचे फोटो काढलेले आहेत. त्याचवेळी त्यांनी मोबाइल हिसकावून घेण्यासाठी हात पुढे केला, मग मी थोडीशी मागे झाले आणि मार्शल आर्टची किक मारली आणि तो खाली पडला. त्याचवेळी दुसरा व्यक्ती माझ्या अंगावर फावडा घेऊन धावून आला. मी लगेच बाजूला झाले आणि त्याला देखील बॅक किक मारली आणि तो देखील खाली पडला. त्यानंतर मी लगेचच तिथून निघून गेले.
(नक्की वाचा: संतापजनक! तक्रार नोंदवायला आलेल्या तरुणीकडे पोलिसानंच केली शरीर सुखाची मागणी)
पोलिसांत तक्रार दाखल
या प्रकाराबाबत हर्षलता गेडाम यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भादंवि.क.352, 34 नुसार दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत. तर वाळू चोरांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मंडल अधिकाऱ्यांना दिले आहेत.
(नक्की वाचा: महिला तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न, वाळू माफीयांचे भयंकर कृत्य)
वाळू चोरट्यांचं धाडस वाढलं
दरम्यान जिल्ह्यात काही समुद्रकिनारी खुलेआम वाळूची चोरी होते. रत्नागिरीतील पांढऱ्या समुद्रकिनारी वाळूची चोरी करणाऱ्या व्यक्तींनी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला केल्यामुळे वाळू चोरट्यांचं धाडस वाढल्याचं दिसत आहे. महसूल यंत्रणेला वाळू चोरीचा हा प्रकार माहीत नाही की त्यांच्या आशीर्वादानेच वाळू चोरी सुरू आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात आता उपजिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला झाल्यामुळे महसूल यंत्रणा काय करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.