Trimbakeshwar News : पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. सुट्टीच्या दिवशी तर मोठ्या संख्येने लोक देवाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. यामुळे मोठी गर्दी होते यातून अनेकदा वादावादीच्याही घटना घडतात. दरम्यान त्र्यंबकेश्वरमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात काल (17 ऑगस्ट) दुपारी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील हा धक्कादायक प्रकार घडला. मंदिर संस्थानने मुख दर्शन अचानक बंद केल्याने भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली होती. याचं रुपांतर वादात झाले आणि यातूनच मारहाणीचा प्रकार घडला. या व्हिडिओमध्ये सुरक्षारक्षक भाविकाला मारहाण करताना दिसत आहे.
15, 16, 17 ऑगस्ट रोजी सलगच्या सुट्ट्यामुळे लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे मोठी रांग होती. यातच अचानक मुखदर्शन बंद झाल्याने भाविकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.