Father Killed Daughter : माणुसकी, नातेसंबंध तसंच सर्व समजुतींना तडा देणारी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्रिपुरामधील एका जवानावर 1 वर्षाच्या मुलीला विष दिल्याचा आरोप आहे. मुलीच्या आईने आता तिच्या पतीसाठी फाशीची शिक्षा मागितली आहे. त्रिपुरा स्टेट रायफल्स (TSR) च्या एका जवानावर आपली 1 वर्षाची मुलगी सुहानी देबबर्मा हिला विष पाजल्याचा आरोप आहे. त्याला मुलगी नको होती आणि याच कारणामुळे त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
बाप ताब्यात
ही घटना शुक्रवारी रात्री खोवाईच्या बेहलाबारीमध्ये घडली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. जीबी रुग्णालयात मुलीची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, खोवाई जिल्हा रुग्णालयातून मुलीला राज्याची राजधानी अगरतला येथील जीबी रुग्णालयात पाठवण्यात आले होते, मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
( नक्की वाचा : Virar : तुझ्या शरीरात 4 राक्षस, 11 वेळा संभोग आवश्यक... विरारच्या नराधमाने अल्पवयीन विद्यार्थिनीला बनवले शिकार )
पत्नीलाही देत होता त्रास
न्यायालयाने आरोपी वडिलांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुलीची आई मिताली देबबर्मा यांच्या म्हणण्यानुसार, बिस्किट आणण्याच्या बहाण्याने पतीने हे कृत्य केले. रथिंद्र देबबर्मा असं या आरोपीचं नाव आहे. त्रिपुरा स्टेट राफलमधील 10 व्या बटालियनमध्ये काम करतो. त्याच्या पत्नीनं सांगितलं की त्याला नेहमीच मुलगा हवा होता. 2 मुली झाल्यामुळे तो त्यांच्यावर नाराज होता. याच कारणामुळे तो त्यांना सतत त्रास देत होता.
आईने विचारताच मारली थप्पड
मिताली देबबर्मा यांनी सांगितले, 'आम्ही माझ्या बहिणीच्या घरी बेहलाबारीला गेलो होतो, जिथे माझा नवरा रथिंद्र देबबर्मा माझ्या मुलीला आणि बहिणीच्या मुलाला बिस्किट विकत घेण्यासाठी एका दुकानात घेऊन गेले होते. तिथे असताना माझ्या बहिणीने पाहिले की माझी मुलगी उलटी आणि जुलाब करत होती. तिच्या तोंडातून औषधाचा तीव्र वास येत होता. मी त्यांचा गळा पकडला आणि विचारले की तू तिला काय खायला दिले, ज्यामुळे तिची अशी अवस्था झाली, तर त्यांनी सांगितले की त्यांनी कोणतेही विष दिले नाही. आता माझी मुलगी जीबी रुग्णालयात मरण पावली आहे. मला काय करावे हे सुचले नाही आणि घाबरून मी माझे केस उपटले, तेव्हा त्यांनी मला थप्पड मारली. मला 2 मुली आहेत आणि ही लहान होती.
मीडियाशी बोलताना, दुःखी आईने तिच्या पतीला, ज्याने स्वतःच्या मुलीचा जीव घेतला, फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. पोलिसांच्या सूत्रांनुसार, पोलिसांनी रथिंद्र देबबर्माला चौकशीसाठी अटक केली असून या धक्कादायक प्रकरणाचा तपास सुरू आहे.