उल्हासनगरात वाहतूक पोलिसांनी एकाच नंबरच्या 2 रिक्षा पकडल्या आहेत. यातला एक नंबर ओरिजनल, तर दुसरा डुप्लिकेट आहे. आपल्याला दंड होऊ नये, म्हणून डुप्लिकेट नंबर लावल्याची कबुली खोटा नंबर लावणाऱ्या रिक्षाचालकानं दिली आहे. हल्लीच्या काळात पोलीस नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या नंबर प्लेटचा फोटो काढतात. त्यानंतर तुम्हाला थेट मोबाईलवर दंडाची पावती येते. तुमच्या वाहनाचा नंबर घेताना तुम्ही आरटीओला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर देता, त्यावर ही पावती येते. पण जर कुणी खोटी नंबर प्लेट लावली असेल तर खऱ्या नंबर प्लेटवाल्या वाहनाला दंड भरावा लागत असल्याच्या घटना वाढत होत्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या काही दिवसात वाहतुकीचे कोणतेही नियम मोडलेले नसतानाही ई चलान द्वारे दंड लागल्याच्या तक्रारी अनेक वाहनचालकांनी वाहतुक पोलिसांकडे केल्या होत्या. खोट्या नंबरप्लेट लावून काही वाहनचालक नियम मोडतात. दंड मात्र खऱ्या वाहनचालकांना लागतो. अशाही बाबी यातून पुढे आल्या होत्या. त्यामुळे डुप्लिकेट नंबरवर लक्ष ठेवण्याच्या सूचना उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भामरे यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या होत्या.
त्याच अनुषंगाने उल्हासनगरच्या फॉलोवर लेन चौकात एका रिक्षाची तपासणी सुरू होती. त्याच वेळी योगायोगाने एकाच नंबरची दुसरी रिक्षा तिथे आली. त्यामुळं पोलिसांनी दोन्ही रिक्षांचे नंबर तपासले. त्यातील एक नंबर ओरिजनल, तर दुसरा डुप्लिकेट असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यातला ओरिजनल नंबर डोंबिवलीच्या रवींद्र पाटील यांचा, तर डुप्लिकेट नंबर माणेरे गावातल्या सुनील पाटील याचा असल्याचं समोर आलं.
ट्रेंडिंग बातमी - Satara News : पाचगणीत आढळले पांढरे सांबर; सह्याद्रीतील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन
आपल्याला दंड होऊ नये, यासाठी खोटी नंबरप्लेट लावल्याचं सुनील पाटील याने सांगितलं. तर आपल्याला मागील काही दिवसात काहीही कारण नसताना 4 ते 5 हजारांचा दंड आल्याचं डोंबिवलीच्या रवींद्र पाटील यांनी सांगितलं. त्यामुळं पोलिसांनी डुप्लिकेट नंबरची रिक्षा ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे. अशा घटना अलिकडच्या काळात वाढ आहेत. त्याला पायबंद बसावा यासाठी वाहतूक पोलीसांनी आता मोहिम हातात घेतली आहे.