तुम्ही रोज कामासाठी घराबाहेर पडत असाल... पण, विचार करा एखादी महिला तिच्या घरातून कामासाठी बाहेर पडलीय. आणि, ती परत आली नाही. मुलं आणि नवरा तिची वाट पाहतायत, पण अचानक कुणीतरी येऊन सांगतं की तुम्ही जिचा शोध घेताय त्या महिलेचा मृतदेह शेतात पडलाय. हे ऐकूण तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये असंच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बरेलीमध्ये नियोजनपूर्वक एकापाठोपाठ 9 महिलांची हत्या झाली आहे. पण ही हत्या कुणी केली हे गूढ अजून कायम आहे. या घटनांमुळे जवळपासच्या भागात दहशतीचं वातावरण आहे. हा लेडी किलर कोण? हा प्रश्न प्रत्येकाला सतावतोय. तो किलर कुठं लपलाय? पोलीस त्याला अद्याप का पकडू शकलेले नाहीत? हे सवाल सर्वजण विचारत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकाच पॅटर्ननं झाली हत्या
बरेलीतील ग्रामीण भागात गेल्या 14 महिन्यांमध्ये 9 महिलांची हत्या झाली आहे. या सर्व हत्या एकाच पद्धतीनं करण्यात आल्या आहेत. हत्या झालेल्या सर्व महिलांचं वय 45 ते 55 च्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातंय. सर्व 9 जणींचा दुपारी शेतामध्ये गळा दाबून जीव घेण्यात आलाय. त्यांचे कपडे फाटलेले होते, पण त्यांच्यावर अत्याचार झाल्याच्या कोणत्याही खूणा नाहीत. बरेलीमध्ये हा सीरिअल किलर राजरोसपणे फिरतोय. त्याची सर्वांमध्ये दहशत पसरलीय.
साडी-ओढणीनं दाबला महिलांचा गळा
याबाबत मीडियामधील वृत्तानुसार ज्या महिलांना मारेकऱ्यांनी लक्ष्य केलंय, त्या सर्व शेतामध्ये काम करत होत्या किंवा शेतामधून परत येत होत्या. त्यांचं वय 45 ते 55 च्या दरम्यान आहे. योजनाबद्ध पद्धतीनं झालेल्या या हत्येनं पोलिसही गोंधळून गेले आहेत. त्यांनी या प्रकरणात काही जणांना पकडलंय, त्यानंतरही या हत्या थांहलेल्या नाहीत. साडी आणि ओढणीचा वापर करुन महिलांची गळा दाबून हत्या होत आहे. या प्रकारामुळे महिला शेतामध्ये जाण्यासाठीही घाबरत आहेत.
( नक्की वाचा : मुलांची किडनी विकण्याची धमकी देणाऱ्या सावकाराची दहशत, सोफ्यावर बसतानाही थरथर कापतात नागपूरकर )
'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी याबाबत सांगितलं की, 'आमची टीम 6 महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या सर्व हत्या एकाच पद्धतीनं झाल्याची माहिती आत्तापर्यंतच्या तपासामध्ये समोर आली आहे. त्यामुळे या हत्या एखाद्या सीरिअल किलरनं केल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.