मनोज सातवी, प्रतिनिधी
Vasai News : वसई तालुक्यातील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या ड्रग्स फॅक्टरी प्रकरणानंतर अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना निलंबित करण्यात आलं आहे. ही कारवाई मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त निकेश कौशिक यांनी केली आहे. मुंबई पोलिसांच्या झोन 6 अमली पदार्थ विरोधी पथकाने नुकताच पेल्हार पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 ते 300 मीटर अंतरावर सुरू असलेल्या ड्रग्स फॅक्टरीवर छापा टाकला होता. या कारवाईत ६ किलो ६७५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल असा सुमारे १४ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
पोलीस ठाण्याजवळ अवैध ड्रग्स निर्मिती...
मुंबई पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणलेल्या ड्रग्सच्या फॅक्टरीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगत पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी चौकशीत अनभिज्ञता व्यक्त केली होती. मात्र, ठाण्याच्या इतक्या जवळ अवैध ड्रग्स निर्मिती सुरू असताना पोलीस अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
नक्की वाचा - Crime News : उधारी परत न केल्याची शिक्षा, 2 हजार रुपयांसाठी मित्राला संपवलं
तसेच निलंबन काळात वनकोटी यांनी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्ष येथे हजेरी देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निलंबनाच्या कारवाईमुळे मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
