प्रतिनिधी, अझरोद्दीन शेख
तुळजापूर येथे गाडीच्या डिक्कीत ठेवलेले 6 लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरी करून पसार झाला आहे. ही चोरीची घटना जवळच लागलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अज्ञात चोरट्याने पाळत ठेवत ही चोरी केली असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. फिर्यादीला चहा पिण्याची इच्छा झाली म्हणून तो हॉटेलमध्ये गेला आणि यावेळी ही चोरीची घटना घडली. प्लॉट खरेदी करण्यासाठी कर्ज काढून तात्यासाहेब राठोड यांनी प्लॉटच्या नोंदणीसाठी 6 लाख रुपये काढून आणले होते. मात्र भरदिवसा पैशांची चोरी झाल्याने राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. भरदुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही चोरीची घटना घडली असून याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तात्यासाहेब महादेव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा लाख रुपये, चेकबुक आणि पासबुक घेऊन चोर दिवसाढवळ्या पसार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत असलेल्या तात्यासाहेब महादेव राठोड 24 मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेतून प्लॉट खरेदी करण्यासाठी पैसे काढले होते. ही रक्कम राठोड यांनी चेकच्या माध्यमातून काढली होती. बँकेतून काढलेले पैसे त्यांच्या मोटरसायकलच्या डिकीत ठेवले होते. त्याचवेळी तात्यासाहेब राठोड यांना चहा पिण्याची इच्छा झाली आणि ते चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. त्यावेळेस संधीचा फायदा साधत एक अज्ञात चोर मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवलेले सहा लाख रुपये, चेकबुक आणि पासबुक घेऊन पसार झाला.
नक्की वाचा - सुराणा ज्वेलर्सवर छापा, 26 कोटी रोख रक्कम, 90 कोटीची बेहिशेबी मालमत्ता जप्त
तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पैशांची चोरी झाल्यानंतर तात्यासाहेब राठोड यांनी तत्काळ तुळजापूर पोलीस स्टेशन गाठून पोलीस ठाण्यात अज्ञात चोरा विरोधात तक्रार दिली. राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव करत आहेत.