Gadchiroli Crime News : गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावात पतीने पत्नीला जिवंत जाळून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीने दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने रागाच्या भरात तिच्यावर पेट्रोल ओतलं. पीडित महिलेवर एक महिन्यापासून उपचार सुरु होते.परंतु, नागपूर रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पीडित महिलेचा आरोपी पतीसोबत प्रेमविवाह झाला होता. प्रियंका सुशील बारसागडे असं मृत महिलेचं नाव आहे. प्रियंकाच्या मृत्यूमुळे तिची दोन्ही मुलं अनाथ झाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दारूच्या व्यसनामुळे सुखी संसार झाला उद्ध्वस्त
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंकाने 2018 मध्ये कुटुंबियांच्या विरोधात जाऊन सुशीलसोबत प्रेमविवाह केला होता. सुशील मजूरी करून घर चालवत होता. लग्नानंतर काही वर्षे दोघांचा सुखाचा संसार सुरू होता.पण,दारूच्या व्यसनामुळे त्यांचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला.सुशील दारूसाठी सतत प्रियंकाकडे पैसे मागायचा आणि दारूच्या नशेत तिला मारहाण देखील करायचा.प्रियंकाने पैसे देण्यासाठी नकार दिला. त्यानंतर आरोपी पतीने तिला बेदम मारहाण केली आणि कपाटातून 2000 रुपये घेऊन तो घरातून निघून गेला. काही वेळानंतर तो पुन्हा घरी परत आला.
नक्की वाचा >> Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं! बस चालकाने मिनी बसमध्ये चिमुकलीवर केला अत्याचाराचा प्रयत्न
5 वर्षांची मुलगीही जोरजोरात रडू लागली अन्..
त्यावेळी प्रियंका स्वयंपाकघरात काम करत असताना त्याने मागून तिच्यावर पेट्रोल ओतलं आणि आग लावली. प्रियंकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिची 5 वर्षांची मुलगी सुप्रिया सुद्धा जोरजोरात रडू लागली आणि शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तो पर्यंत प्रियंका 40 ते 50 भाजली होती. आरोपी पतीने चादरीने आग विझवण्याचं नाटक केलं.या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या प्रियंकाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आणी त्यानंतर तिला नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं.परंतु, तिची प्रकृती खालावल्यामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रियंकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार,गडचिरोली पोलिसांनी आरोपी सुशील चिंटूजी बारसागडे याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.