प्रतिक राठोड, प्रतिनिधी
Fake Birth Registration Case : यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील शेंदुरसणी या छोट्याशा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. ज्या गावाची एकूण लोकसंख्या जेमतेम 1500 आहे, तिथे सरकारी रेकॉर्डवर अचानक 27 हजार 397 जन्माच्या नोंदी आढळल्याने संपूर्ण प्रशासन हादरले आहे.
हा प्रकार सामान्य तांत्रिक चूक नसून एक मोठा आंतरराज्यीय सायबर घोटाळा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोहोचले असून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
शेंदुरसणी ग्रामपंचायतीमध्ये सी.आर.एस. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जन्म आणि मृत्यूच्या नोंदी केल्या जातात. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अचानक या सॉफ्टवेअरमध्ये 27 हजार 397 जन्माच्या आणि 7 मृत्यूच्या नोंदी आढळून आल्या. गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा कित्येक पटीने मोठा असल्याने संशय बळावला.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गावात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता, यातील एकही नोंद स्थानिक स्तरावर झालेली नसल्याचे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंदी होणे अशक्य असल्याचे निष्पन्न झाले.
( नक्की वाचा : Manikrao Kokate : कोकाटेंचा गेम ओव्हर ! मुख्यमंत्र्यांनी पंख छाटले, अटक वॉरंटनंतर झाला मोठा निर्णय )
मुंबई आणि दिल्ली कनेक्शनचा खुलासा
या प्रकरणाच्या तांत्रिक तपासासाठी हे प्रकरण पुणे येथील आरोग्य सेवा उपसंचालकांकडे पाठवण्यात आले होते. राज्यस्तरीय लॉगिनवरून तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. शेंदुरसणी ग्रामपंचायतीचा सी.आर.एस. आयडी चक्क मुंबईत मॅप असल्याचे दिसून आले.
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने अतिरिक्त रजिस्ट्रार जनरल कार्यालय आणि दिल्लीच्या राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राची (एनआयसी) मदत घेण्यात आली. तांत्रिक अहवालानुसार, हा संपूर्ण प्रकार सायबर फ्रॉड असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
या प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी शेंदुरसणी गावाला भेट दिल्यानंतर सोशल मीडियावर माहिती दिली की, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 या काळात या सर्व नोंदी करण्यात आल्या आहेत.
या नोंदींमध्ये किताबून निसा, मोहम्मद आझाद, शमशाद अहमद, खुर्शीद आलम यांसारख्या नावांचा समावेश असून यातील अनेक व्यक्ती पश्चिम बंगाल, उत्तर भारत आणि बांगलादेशाशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ग्रामपंचायतीचे कॉम्प्युटर टर्मिनल, ओटीपी आणि ईमेल आयडीचा गैरवापर करून हा आंतरराज्यीय घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत हा गैरप्रकार समोर आल्यानंतर आता सायबर सेल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या मदतीने पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत. या घोटाळ्यामागे नेमके कोणते रॅकेट सक्रिय आहे आणि या बोगस प्रमाणपत्रांचा वापर कशासाठी केला जाणार होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.