Yavatmal News : एकीकडे पाहुणचाराचा थाट आणि दुसरीकडे संशयाचे काळेकुट्ट जाळे या विसंगतीत एका निष्पाप गृहिणीचा बळी गेला आहे. 'मटण नीट शिजलं नाही' या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी झाली. पतीने त्यांच्या मित्रासमोर केलेला अपमान सहन न झाल्याने पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
भरल्या ताटावरुन उठली अन्...
33 वर्षीय चेतना मनोज जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. चेतना जाधव हिच्यासाठी तो दिवस शेवटचा ठरेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. चेतनाचा पती मनोज जाधव याने एका मित्राला जेवणासाठी घरी बोलावले होते. 'मटणाची भाजी बेतशीर आणि चांगली कर,' अशी सूचना त्याने पत्नीला दिली होती. अंगणात जेवणाचा बेत रंगला होता, पण पाहुण्यासमोरच मनोजचा पारा चढला. मटण व्यवस्थित शिजलं नसल्याच्या कारणावरून त्याने पत्नीशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात मनोजच्या जुन्या संशयी स्वभावाची आणि व्यसनाचीही पार्श्वभूमी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज हा दारूच्या आहारी गेला होता. यापूर्वीही २०१५ मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१७ मध्ये 'पुन्हा सुखाने संसार करू' या अटीवर चेतनाने त्याला माफ केले होते. मात्र, बुधवारी झालेल्या अपमानाचा घाव चेतना हिच्या मनाला इतका खोल लागला की, तिने टोकाचं पाऊल उचललं. भरल्या ताटावरून उठून ती घरात गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केलं. बाहेर येऊन जेव्हा तिने पतीला ही बाब सांगितली, तेव्हा एकच खळबळ उडाली. तिला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण नियतीला काही वेगळेच मान्य होतं. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं.
चेतनाचे मामा देवगाव येथील रहिवासी मनोहर राठोड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चेतनाचा पती मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून त्यास अटक केली आहे. चेतनाच्या मृत्यूनंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी केलेली गर्दी आणि त्यांचा आक्रोश काळजाला पिळवटून टाकणारा होता. आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले असून पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निनगूरकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.