अज्ञात व्यक्तीचा फोन आणि दूध डेअरी संचालकाच्या खात्यातील साडे चोवीस लाख गायब!

डेअरीचे खाते रिकामे झाल्याने शेतकऱ्यांचे थकलेले दुधाचे पैसे कसे द्यायचे, हा प्रश्न तानाजी भोसले यांच्यासमोर आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
धाराशिव:

ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील जेजला गावातील येडेश्वरी दूध डेअरीचे चेअरमन तानाजी दत्तु भोसले यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. बँक खाते अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी त्यांना तब्बल 24 लाख 47 हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भोसले यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीनं भोसले यांना बँक खाते अपडेट करण्याची गरज असल्याचे सांगितले.  आरोपीने भोसले यांच्याकडून आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती घेतली आणि व्हॉट्सॲपवरून आयडीबीआय बँकेची एक फाईल पाठवली. ती फाईल मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले.

( नक्की वाचा : कल्याणच्या दुर्योधनाचे वडिवलीत महाभारत, KDMC अधिकाऱ्यांना रिव्हॉल्व्हर दाखवून मारहाण )

भोसले यांनी ती फाईल इन्स्टॉल करताच त्यांचे आयसीआयसीआय बँक खाते हॅक झाले. चोरट्यांनी त्यांच्या येडेश्वरी दूध डेअरीच्या बँक खात्यातून 24 लाख 47 हजार रुपये ऑनलाइन काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भोसले यांनी तातडीने धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

सायबर पोलिसांनी भा. न्या. स कलम 318(4) सह कलम 66 ( C ) , कलम 66 ( D ) अंतर्गत गुन्हा नोंद केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. डेअरीचे खाते रिकामे झाल्याने शेतकऱ्यांचे थकलेले दुधाचे पैसे कसे द्यायचे, हा प्रश्न तानाजी भोसले यांच्यासमोर आहे. यामुळे डेअरीवर दूध घालणारे सर्वसामान्य शेतकरी देखील अडचणीत आले आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article