- अकोल्यातील गोपाळ शर्मा यांच्या चहा टपरीवर राजकीय वाद टाळण्यासाठी विशेष पोस्टर लावण्यात आलं आहे
- पोस्टरवर लोकांना राजकीय चर्चा न करण्याची विनंती आणि मतदान करण्याचा संदेश दिला जात आहे
- चहा टपरीवर राजकीय वाद सुरू झाल्यामुळे गोपाळ शर्मा यांनी लोकांना समजावून शांतता राखण्याचा सल्ला दिला
योगेश शिरसाट
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. काही दिवसात मतदान होणार आहे. त्यामुळे नाक्या नाक्यावर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शहरातील कॅन्टीन असतील किंवा हॉटेल असतील इथं राजकीय चर्चांचे फड रंगताना दिसत आहे. त्यातून काही ठिकाणी वाद ही होत आहेत. जर एकाचे दुसऱ्याला पटले नाही तर त्यांच्या हातापाई होतानाही दिसत आहे. अशा वेळी दुकांनदारांनी काय करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यावर उपाय म्हणून अकोल्यातील एका चहा टपरीवाल्याने नामी शक्कल शोधून काढली आहे. यामुळे साप भी मरे और लाठी भी ना तुटे अशी आयडियाच त्यांनी केली आहे.
अकोल्यातील सिविल लाईन चौकातील एक चहाची टपरी आहे. तिथे अनेक लोक चहा पिण्यासाठी येतात. लोक एकत्र आले की चर्चा ही आलीच. त्यात ही निवडणुकीचा काळ असल्यामुळे राजकीय चर्चा रंगतात. त्या ही चहा टपरी मात्र अपवाद ठरत आहे. त्याला कारणही तसंच आहे. या टपरीवर वर एक पोस्टर लावण्यात आलं आहे. हे पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधत आहे. चहा पिण्यासाठी येणाऱ्याचे पहिल्यांदा लक्ष याच पोस्टरवर पडत आहे. त्यावरचा मजकूर सर्वांनाच आकर्षित करत आहे.
त्या पोस्टवर लिहीलं आहे की, राजकीय चर्चा, राजकीय वाद करू नका. अशी विनंती वजा सूचना चहा टपरी वाल्याने केली आहे. गोपाळ शर्मा यांची ही टपरी आहे. त्यावर त्यांनी लिहीले आहे की राजकारणा विषयी बोलून वाद करू नका किंवा गोंधळ घालू नका. मतदान करा हा आपला हक्क आहे. असा संदेश ही दिला आहे. त्या पोस्टरची चर्चा सध्या अकोला शहरात चांगलीच रंगू लागली आहे. एकीकडे राजकीय चर्चा नको हे सांगत असताना त्यांनी मतदान जरूर करा हा संदेश ही दिला आहे. लोकांनाही हा संदेश भावत आहे.
गोपाळ शर्मा यांनी आधी हे पोस्टर लावले नव्हते. पण त्यांच्या चहा टपरीवर काही व्यक्ती आल्या होत्या. त्यांच्यात चर्चा सुरू होती. ती चर्चा टिकेपर्यंत गेली. मोठ्या नेत्यांबद्दल वाट्टेल ते बोलण्यात आलं. ही गोष्ट शर्मा यांना पटली नाही. त्यांनी त्या लोकांची समजूत काढली. त्यानंतर त्यांना टपरीवरून समजावून पाठवण्यात आलं. पुन्हा असं घडू नये त्यासाठी त्यांनी टपरीवर एक पोस्टर लिहीले. त्यात चहा प्या पण राजकीय चर्चा नको असा प्रेमाचा सल्ला त्यांनी दिला आहे. भांडणं करणं हे सर्व सामन्याचं काम नाही. मतदान करणं हे आपलं काम आहे असं त्यांनी सांगितलं.