लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा निमित्त उमेदवार, पुढारी गावागावात फिरत आहेत. तसे गावकऱ्यांना या पुढाऱ्यांचे दर्शन दुर्मिळच असते. अशा वेळी काही गावकरी पुढाऱ्यांना गेल्या 5 वर्षाचा जाबच विचारत आहे. अशीच एक घटना अकोला लोकसभा मतदार संघात घडली आहे. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे हे मतदार संघातील सुकंडा गावात प्रचारासाठी गेले होते. अनुप हे माजी खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा आहे. गावात येताच गावकऱ्यांनी त्यांना घेरले, त्यानंतर धारेवरही धरले. तुम्हाला गेल्या दहा वर्षात आमचे गाव दिसले नाही, कोणताच विकास केला नाही, मग आम्ही तुम्हाला मतदान का करावं असा जाबच विचारला. शिवाय गेल्या दहा वर्षात तुमच्या वडीलांनी काय केले अशी विचारणाही केली. गावकऱ्यांचा हा आक्रमक पणा पाहून अनुप निरुत्तर झाले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह काढता पाय घेतला. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
रिसोड-मालेगावकडे दुर्लक्ष
वाशीम जिल्ह्यातील रिसोड - मालेगाव विधानसभा मतदार संघ हे अकोला लोकसभा मतदार संघात येतात. या मतदार संघाकडे संजय धोत्रे यांनी नेहमीच दुर्लक्ष केल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. त्यामुळेच त्यांचा मुलगा आणि भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संजय धोत्रे यांना या मतदार संघाने नेहमीच साथ दिली. धोत्रे खासदार झाले. पुढे केंद्रात मंत्रीही झाले. पण त्यांना या भागाकडे लक्ष दिले नाही. निधी वाटप करताना देखील जवळील पदाधिकारी व ठराविक गावांनाच निधी दिल्याची चर्चा मतदार संघात आहे. मालेगाव तालुक्यात कुठलेच नवीन उद्योग आले नाहीत. रस्ते, रोजगार, आणि सिंचनासह अनेक प्रश्न रिसोड व मालेगाव तालुक्यात कायम आहेत.
पाहा व्हीडिओ- https://youtube.com/shorts/5sLkjdpvt1U?si=0ih0L2gsHQdXK047
अनुप धोत्रेंनी घेतला काढता पाय
धोत्रे मत मागायला आले असात सुकंडा गावातले गावकरी आक्रमक झाले होते. त्यांना दहा वर्षाचा जाब विचारल्यानंतर काय बोलावे हेच अनुप यांना समजले नाही. त्यांना सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकर्त्यांनही गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी पुढाकार घेतला. पण गावकरी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे अखेर अनुप यांना तिथून कार्यकर्त्यांसह काढता पाय घ्यावा लागला. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या मतदार संघात अनुप धोत्रेंची लढत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर होत आहेत.
कोण आहेत अनुप धोत्रे?
अकोला लोकसभा मतदार संघाचे अनुप धोत्रे उमेदवार आहेत. त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. अनुप यांचे संजय धोत्रेहे वडील आहे. संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. शिवाय ते केंद्रीय मंत्री ही राहीले आहेत. यावेळी संजय धोत्रे यांच्या ऐवजी अनुप धोत्रेंना उमेदवारी देण्यात आली आहे.