नायक आणि खलनायकाच्या रुपकांचा खेळ; आरोप-अपमानांमुळे आंध्र प्रदेशात सुरू झाला नवा अध्याय

एनटीआर यांनी मंगळसूत्र बांधण्यासाठी हात पुढे केले, त्यांच्यासमोर लक्ष्मी उभ्या होत्या आणि तेवढ्यात लाईट गेले. ते गेले नव्हते तर घालवण्यात आले होते. लाईट गेल्यामुळे लक्ष्मी यांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं अथवा नाही हे जनतेला कळालं नाही.

Advertisement
Read Time: 5 mins
मुंबई:

दाक्षिणात्य चित्रपटांच्या कथा वेगळ्या असल्या तरी त्यातला मूळ गाभा हा त्यातला नायक असतो. हा नायक आधी शेळपट असतो मग तो अचानक वाघ होतो आणि खलनायकाचा नायनाट करतो असं दाखवण्यात येतं. दक्षिणेकडची राज्ये नायकांना डोक्यावर उचलून घेतात, मग तो चित्रपटातला असो अथवा राजकारणात. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांमध्ये अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या आणि यशस्वी झालेल्यांची संख्या बरीच मोठी आहे. तमिळ अभिनेते एम.जी.रामचंद्रन, अभिनेत्री जयललिता, तेलुगू अभिनेते एन.टी.रामाराव या सारख्या कलाकारांना सिनेसृष्टीत मिळालेल्या अपार यशानंतर राजकारणी म्हणूनही जनतेचं अपार प्रेमही मिळालं. या तिघांनी आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. या सगळ्यांचा जीवनप्रवास पाहिला तर या सगळ्यांचे खासगी जीवन हे प्रचंड वादग्रस्त होते आणि त्यांना कधी नायकाचे रुपक देण्यात आले तर कधी खलनायकाचे रुपक देण्यात आले. या तिघांनाही राजकीय कट कारस्थाने करणाऱ्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला,  त्यासाठी या तिघांचे स्वभावही कारणीभूत होते.  एनटी रामाराव यांच्याबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्या जावयानेच त्यांच्याविरोधात कट रचला आणि त्यांच्या हातून सत्ता खेचून घेतली. मात्र एनटी रामाराव हे त्यांची दुसरी पत्नी लक्ष्मी पार्वतीच्या आकंठ प्रेमात बुडाले होते.

चित्रपटात जसं दाखवतात तसं एन.टी.आर यांनी जाहीर सभेत मंचावरून लक्ष्मी यांना साद घातली होती. लक्ष्मी या गर्दीतून वाट काढत मंचाकडे झेपावल्या होत्या. मंचावरच एनटीआर हे लक्ष्मी यांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणार होते.  हा प्रसंग हजारो, लाखों लोकं पाहात होती. एनटीआर यांनी मंगळसूत्र बांधण्यासाठी हात पुढे केले, त्यांच्यासमोर लक्ष्मी उभ्या होत्या आणि तेवढ्यात लाईट गेले. ते गेले नव्हते तर घालवण्यात आले होते. लाईट गेल्यामुळे लक्ष्मी यांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं अथवा नाही हे जनतेला कळालं नाही. 

फोटोमध्ये डावीकडून- लक्ष्मी पार्वती, एनटी रामाराव, चिरंजीवी
Photo Credit: Youtube

ज्या व्यक्तीने लाईट घालवले, असे म्हणतात त्या व्यक्तीने 12 जून 2024 रोजी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची पुन्हा एकदा शपथ घेतली. एनटीआर यांचे जावई, तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी एनटीआर यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांच्या हाताखालून अशरक्ष: खेचून घेतला होता. लक्ष्मी यांच्या प्रेमात बुडालेल्या एनटीआर यांना आपली मुले आणि घरातल्या इतर व्यक्तीही आपल्या विरोधात गेल्याचं कळालं नाही. एनटीआर यांचं आपल्या कुटुंबाकडे विशेष लक्ष नसायचं. ते अत्यंत हेकेखोर स्वरुपाचे होते. ते कमालीचे संशय होते आणि कोणावरही पटकन विश्वास ठेवायचे नाही. लक्ष्मी यांच्यावर प्रेम जडल्यानंतर तिच्याशिवाय त्यांना काही दिसेनासे झाले होते. ही सगळी परिस्थिती चंद्राबाबू नायडू पाहात होते.  

Advertisement

एनटीआर आणि चंद्राबाबू नायडू
Photo Credit: tdp.ncbn.official

1995 साली ऑगस्ट महिन्यात चंद्राबाबूंनी आमदारांची जमवाजमव केली आणि सत्तेवर दावा ठोकला. यासाठी एनटीआर यांच्या मुलानेही त्यांना मदत केली होती. 198३ साली काँग्रेस सोडून एनटीआर यांनी स्थापन केलेल्या टीडीपीमध्ये नायडूंनी प्रवेश केला. एनटीआर यांची सत्ता आल्यानंतर नायडू हे अर्थमंत्री झाले होते. सगळा मान सन्मान मिळूनही नायडू अस्वस्थ होते. त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खुणावत होती आणि ती मिळवणं हे त्यांचं ध्येय आणि स्वप्न बनलं होतं. 1995 साली नायडूंना ती संधी मिळाली.  ज्याच्यावर विश्वास केला, ज्याच्या हातात मुलीचा हात दिला, ज्याला अर्थमंत्री बनवलं त्याने आपला अशा पद्धतीने घात केला ही कल्पना एनटीआर यांना सहन होत नव्हती. त्यांनी नायडू यांचे त्यानंतर कधीही तोंड पाहिले नाही.

Advertisement

एनटी रामाराव यांचे निधन झाल्यानंतर चंद्राबाबू यांनी आपले स्थान आणखी बळकट केले. आंध्र प्रदेशला हायटेक करणारे, सायबर सिटी निर्माण करणारे मुख्यमंत्री म्हणून नायडूंचा नावलौकीक झाला होता. 1995 ते 2004 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. 2014 साली टीडीपी पुन्हा सत्तेत आली आणि ते पुन्हा मुख्यमंत्री बनले आणि इथून एका नव्या संघर्षाला सुरुवात झाली. वाय एस राजशेखर रेड्डी यांचा मुलगा आणि वायएसआर काँग्रेसचा प्रमुख तरुण नेता जगन मोहन रेड्डी याला बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात डांबण्यात आलं होतं. आपला राजकीय प्रतिस्पर्धी संपवण्यासाठी नायडूंनी  ही खेळी रचल्याचा आरोप केला जात होता. 16 महिन्यानंतर जगन जामिनावर तुरुंगाबाहेर आले. त्यानंतर त्यांनी पदयात्रा काढत संपूर्ण आंध्र प्रदेश पिंजून काढला आणि नायडूंच्याविरोधात रान उठवलं. परिणामी टीडीपीचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव सुरू झाला. जगन मोहन रेड्डी मुख्यमंत्री होताच ते नायडूंच्यामागे हात धुवून लागल्याचा आरोप केला जातो.  ज्या पद्धतीने नायडूंनी जगन यांना तुरुंगात पाठवले त्याच पद्धतीने जगन यांनी नायडूंना तुरुंगात पाठवले असे म्हटले जाते. 52 दिवस नायडू तुरुंगात होते. कौशल्य विकास योजनेत घोटाळा केल्याचा नायडूंवर आरोप करण्यात आला होता. तुरुंगात जाण्यापूर्वी आणि नंतर नायडू यांच्यावर वायएसआर पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी बेफाम आरोप केले. नायडूंच्या कुटुंबियांविरोधातही आरोप करण्यात आले. हे सगळं पाहिल्यानंतर संतापलेल्या आणि अपमानित झालेल्या नायडूंना आंध्र प्रदेशच्या विधानसभेत अश्रू अनावर झाले होते. त्यांनी अश्रूंना आवर घालत  जाहीर शपथ घेतली होती की जोपर्यंत मी पुन्हा सत्ता मिळवत नाही तोपर्यंत या सदनात पाय ठेवणार नाही.  अशीच काहीशी परिस्थिती नायडूंच्या पक्षाने जगन यांच्यावरही आणली होती. टीडीपी सत्तेत असताना त्यांच्या नेत्यांनी विधानसभेत जगन यांच्यावर इतके जबरदस्त हल्ले आणि आरोप केले की जगन सदनातून निघून गेले. ते परतले ते थेट मुख्यमंत्री बनूनच. यावेळी जगन नायक झाले होते आणि चंद्राबाबू खलनायक झाले होते.  

Advertisement

पवन कल्याण आणि चंद्राबाबू नायडू यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत  एकत्र प्रचार केला
Photo Credit: tdp.ncbn.official

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चंद्राबाबू नायडूंविरोधात 10 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा नारा लोकेशविरोधात 16 गुन्हे दाखल करण्यात आले. नायडूंचे कार्यालय बुलडोझर लावून भुईसपाट करण्यात आले. टीडीपी मुख्यालयावर कारवाई करण्यात आली. या परिस्थितीमुळे नायडू हादरले होते, मात्र त्यांनी प्रयत्न करणं सोडलं नाही. दाक्षिणात्य चित्रपटात कधी शेळी असणारा नायक अचानक वाघ होतो तशीच परिस्थिती आंध्रच्या राजकारणात पाहायला मिळाली.  तुरुंगात गेलेले नायडू हे शेळी म्हणून आत गेले होते, मात्र बाहेर येताना ते वाघ झाले होते. पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत हातमिळवणी करत नायडूंनी आंध्र प्रदेशात चमत्कार घडवून आणला. टीडीपीने मित्रपक्षांसोबत मिळून पक्षासोबत मिळून 175 पैकी 164   जागांवर विजय मिळवला. कधी नायक कधी खलनायकाच्या चक्रात चंद्राबाबू नायडू आता नायकाच्या रुपात आलेत आणि जगन मोहन रेड्डी हे नायकाच्या रुपातून खलनायकाच्या रुपात गेले आहेत.