Bankipur bypoll: भाजपचा अभेद्य गड ढासळला! 25 वर्षांचा दबदबा संपला, भाजपच्या पराभवाची 5 कारणे

तरूणांनी आपली भूमीका या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्टपणे दाखवून दिली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

बिहारच्या राजकारणात 3 ऑगस्ट 2026 चा दिवस एका मोठ्या राजकीय उलथापालथीसाठी ओळखला जाईल. राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या काळापासून भारतीय जनता पक्षाचा (BJP) अभेद्य बालेकिल्ला म्हणून बांकीपुर (पूर्वीचे पाटणा पश्चिम) विधानसभा मतदारसंघाची ओळख होती. याच बालेकिल्ल्याला सुरूंग लागला आहे. या मतदार संघातील पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झालेल्या या जागेवर भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत चमत्कार करून दाखवला आहे. त्यांनी संपूर्ण राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत.

जन सुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी बांकीपुर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे इथलं राजकीय वातावरण सुरूवाती पासून तापलं होतं. त्यांच्या थेट निवडणूक रिंगणात उतरण्याने भाजपला आपला उमेदवार बदलावा लागला होता. सुरुवातीला भाजपने अभिषेक बंटी यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली. त्यानंतर भाजपने नीरज कुमार सिन्हा या नव्या चेहऱ्याला मैदानात उतरवले. मात्र, 3 ऑगस्ट 2026 रोजी बांकीपुरच्या जनतेने असा निकाल दिला, ज्यामुळे भाजपच्या दिग्गज नेत्यांनाही धक्का बसला आहे. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. कारण हा मतदार संघ त्यांचा होता. ते इथून सलग पाच वेळा विजयी झाले होते. 

Advertisement

नक्की वाचा - वडिलांचा जेमतेम पगार; संभाजीनगरच्या दिपकेंचा परदेशातील शिक्षणाचा खर्च कुणी केला? राजकीय प्रवेशाचीही चर्चा

प्रशांत किशोर यांच्या ऐतिहासिक विजयाची 5 प्रमुख कारणे

1. उमेदवार बदलणे भाजपला पडले महाग
भाजपने सर्वात आधी अभिषेक बंटी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अर्ज दाखल केल्यानंतर बंटी यांच्या कुटुंबाचे नाव चारा घोटाळ्याशी जोडले गेले. याची मोठ्या प्रमाणात मतदार संघात चर्चा झाली. त्याला प्रसिद्धी ही मिळाली. या चर्चेमुळे त्यांनी निवडणुकीतूनच अचानक माघार घेतली. त्यानंतर भाजपने घाईघाईत नवीन उमेदवार दिला. पक्षाच्या या निर्णयामुळे मतदारांमध्ये नकारात्मक संदेश गेला.

2. प्रशांत किशोर यांच्यामुळे बदलला निवडणुकीचा अजेंडा
जन सुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांच्या मैदानात उतरण्याने बांकीपुरची लढत हायप्रोफाइल झाली. त्यांनी स्थानिक प्रश्न आणि सकारात्मक प्रचारावर भर दिला. भाजपवर थेट हल्ला न करता त्यांनी लोकांशी थेट संवाद साधला होता. सत्ताविरोधी लाटेचा पूर्ण फायदा त्यांनी उठवला. लोकांशी थेट संवाद त्यांच्या पथ्थ्यावर पडला. त्यांनी भाजपला थेट अंगावर घेतलं नाही. उलट सरकारच्या चूका दाखवून दिल्या. 

3. भाजप कार्यकर्ते आणि मतदारांमधील उदासीनता
बांकीपुर हा भाजपचा सुरक्षित गड मानला जात होता. या ठिकाणी दगड जरी उभा केला तरी निवडून येईल असा भाजपचा समज होता. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अतिआत्मविश्वास दिसला. मतदानाच्या दिवशी भाजपचे कार्यकर्ते मतदारांना घराबाहेर काढण्यात अपयशी ठरले. याउलट, प्रशांत किशोर यांनी 'मायक्रो मॅनेजमेंट'च्या जोरावर आपल्या मतदारांना बूथपर्यंत पोहोचवले.

4. Gen Z आंदोलनाचा मोठा प्रभाव
निवडणूक प्रचारात तरुण पिढीचा कौल भाजपच्या विरोधात स्पष्टपणे दिसला. दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या 'Gen Z' आंदोलनाचा प्रभाव या निवडणुकीवर पडला. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मतदारांनी सत्ताधारी पक्षाऐवजी जन सुराज्याला पसंती दिली आहे असे या निकालावरून दिसत आहे. तरूणांनी आपली भूमीका या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्टपणे दाखवून दिली आहे. 

Advertisement

5. आरजेडीच्या व्होट बँकवर प्रशांत किशोर यांचा कब्जा 
2025 च्या विधानसभा निवडणुकीत आरजेडी दुसऱ्या क्रमांकावर होती. मात्र, यावेळी आरजेडी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. तेजस्वी यादव यांचे प्रचारात उशिरा येणे हे या मागचे प्रमुख कारण मानले जात आहे. पक्षाच्या निष्क्रियतेमुळे मुस्लिम-यादव (MY) ही आरजेडीची पारंपरिक व्होट बँक जन सुराज्यकडे वळली गेल्याचं ही या निकालावरून स्पष्ट होत आहे.