- अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपने काँग्रेससोबत युती केली असून शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे
- भाजपचे तेजश्री करंजूले यांनी शिंदे सेनेच्या मनिषा वाळेकर यांचा दणदणीत पराभव केला होता
- अंबरनाथमध्ये भाजपचे पंधरा, काँग्रेसचे बारा आणि राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निवडून आले आहेत
अमजद खान
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात भाजप शिवसेना शिंदे गट महायुतीचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे. मात्र दुसरीकडे अंबरनाथ नगरपरिषदेत जे झाले आहे, ते बघून राजकीय क्षेत्रातील सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. कारण अंबरनाथ नगरपरिषदेत मित्र पक्षाला डावलून भाजपने काँग्रेस सोबत युती केली आहे. भाजपने या ठिकाणी शिंदे सेनेला धक्का दिला आहे. आधी नगराध्यक्ष भाजपचा आला आणि आता काँग्रेसला सोबत घेतले. असं करत एकामागोमाग दोन धक्के शिंदे सेनेला दिले आहेत.
अंबरनाथ बदलापूर नगरपरिषद निवडणूक भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर लढविली होती. या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले. ही शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का होता. शिवसेनेचा हा बालेकिल्ला भाजपने काबिज केला. अंबरनाथचा निकाल हा आश्चर्चकारक होता. अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजश्री करंजूले यानी शिंदे सेनेच्या मनिषा वाळेकर यांचा दारुण पराभव केला. आता सत्तेची समीकरणे अशी जुळली की भल्याभल्यांना आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी युतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. अंबरनाथ नगरपरिषेदत भाजपचे 15, काँग्रेस 12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 4 सदस्य निवडून आले आहेत. या तिघांनी मिळून सत्तेचा कोरम पूर्ण केला आहे. शिवाय शिंदे सेनेला जोरदार झटका दिला आहे. शिवसेनेचे 28 नगरसेवक निवडून आले आहेत. या बाबत आमदार किणीकर यांचे म्हणणे आहे की, अंबरनाथमध्ये पारंपारिक युती व्हायला हवी होती. पण ती झाली नाही याचं दुख आहे असं ते म्हणाले.
युतीचे बोलणे आमचे राज्यातील नेते करत होते. भाजपचा जो काँग्रेस मुक्तीचा नारा आहे, त्याला छेद देण्याचे काम या ठिकाणी झाले आहे. सत्तेसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेस सोबत अभद्र युती केली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत चुकीचा मेसेज युती करुन दिला गेला आहे असं आमदार बालाजी किणीकर म्हणाले. तर भाजपचे नेते गुलाब करंजुले यांनी सांगितले की, निवडणुकीत नागरीकांना आम्ही शब्द दिला होता की, अंबरनाथ भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करणार. जनतेचा आदर ठेवून आम्ही आघाडी केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपात शिवसेनेचे दोन नगराध्यक्ष जेलमध्ये गेले. आता किती लोक जाणार असा सवाल उपस्थित करत काँग्रेससोबतच्या युतीचे समर्थन केले आहे.