- हरयाणाच्या रेवाडी नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या महिला आमदार बिमला चौधरी यांनी मतदानासाठी अनोखे आश्वासन दिले आहे
- त्यांनी प्रचारसभेत अविवाहित तरुणांना आधी मतदान करा मग लग्न लावून देईन असे आश्वासन दिले आहे
- बिमला चौधरी यांनी स्वतःचे पलवल शहराशी नाते सांगत पलवलच्या मुलींच्या भेटींचा आधारही दिला आहे
निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्षा वेगवेगळ्या आयडिया करत असतात. अशाच काही आयडियांची चर्चा देशभर होत असते. अशीच एक आयडिया सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहे. हरयाणाचे राजकारण नेहमीच आपल्या सडेतोड आणि विनोदी शैलीसाठी ओळखले जाते. सध्या रेवाडीमध्ये नगर परिषद निवडणुकीची रणधूमळी सुरू आहे. इथं भाजपच्या एका महिला आमदाराने प्रचारादरम्यान दिलेले अजब आश्वासन चर्चेचा विषय ठरले आहे. 'आधी मतदान करा, मग लग्न लावून देते', असे आश्वासन पटौदीच्या भाजप आमदार बिमला चौधरी यांनी दिले आहे. त्यांच्या या लग्नाच्या गॅरंटीची चर्चा सगळीकडेच आहे.
नेमके प्रकरण काय?
रेवाडी नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार विनीता पीपल यांच्या प्रचारासाठी एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना बिमला चौधरी यांनी थेट अविवाहित तरुणांना साद घातली. त्या म्हणाल्या, "रेवाडीतील कोणताही मुलगा आता अविवाहित राहणार नाही. तुम्ही भाजपला मतदान करा, मी तुमच्या सर्वांची लग्ने लावून देईन." आधी मत द्या मग नवरी मिळवा अशी थेट ऑफरच त्यांनी गावातल्या तरुणांना दिली. त्यामुळे ही ऑफर की लग्नाचे गाजर आहे अशी चर्चा ही रंगली आहे.
'पलवल कनेक्शन' आणि लग्नाचा वायदा
आपल्या या आश्वासनामागे त्यांनी स्वतःचे 'पलवल कनेक्शन' जोडले. "मी पलवलची मुलगी आहे. रेवाडीमध्ये पलवलच्या मुलींची अनेक स्थळे येतात. याच नात्याच्या जोरावर मी तरुणांना लग्नाचा भरवसा देते," असे चौधरी यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. राजकीय सभांमधील गांभीर्य हरवत चालले असताना, मतदारांना अशा भावनिक आणि विनोदी आश्वासनांनी भुलवण्याचा हा प्रकार लोकशाहीतील प्रचाराची खालावलेली पातळी दर्शवतो की केवळ एक विनोद, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
आरती राव यांनी घेतली फिरकी
यावेळी मंचावर हरियाणाच्या आरोग्यमंत्री आरती राव देखील उपस्थित होत्या. आमदारांचे हे अनोखे आश्वासन ऐकून त्यांनाही हसू अनावर झाले. त्यांनी मंचावरूनच टोला लगावला की, "बिमला चौधरी यांनी आता चक्क 'मॅरेज ब्युरो'च उघडला आहे!" मंत्र्यांच्या या टिप्पणीनंतर संपूर्ण सभेत हस्याचे फवारे उडाले. निवडणुकीत रस्ते, पाणी आणि वीज मिळण्याचे आश्वासन तुम्ही ऐकले असेल, पण हरयाणात तर चक्क नवरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले जात आहे.