- महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेची युती अनेक ठिकाणी तुटली
- नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा भाईंदर, अकोला, अमरावती आणि जालना महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढणार
- मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नागपूर, वसई विरार, पनवेल या महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना युतीत लढणार आहेत
महापालिका निवडणुकींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज मंगळवारी शेवटची तारीख होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत युतीची चर्चा सुरू होती. पण शेवटच्या क्षणी काही महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली. तर काही ठिकाणी ही युती तुटली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भाजप शिवसेना एकमेकां विरोधात ठाकणार आहेत. अशा वेळी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आता या दोन पक्षात चुरस असणार आहे. बहुतांश महापालिकांमध्ये महायुतीतल्या पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी भाजपने राष्ट्रवादी सोबत तर काही ठिकाणी शिंदे सेना आणि राष्ट्रवादी सोबत युती केली आहे.
भाजप आणि शिवसेना यांची युती अनेक महापालिकांमध्ये तुटली आहे. त्यात प्रामुख्याने नवी मुंबई महापालिकेचा समावेश आहे. शेवटपर्यंत या महापालिकेत युती व्हावी यासाठी चर्चा सुरू होती. पण शेवटच्या क्षणी इथली युती तुटली आणि शिवसेना शिंदे गट आणि भाजपने वेगळे लढण्याची घोषणा केली. इथं एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नवी मुंबई प्रमाणे उल्हासनगर महापालिकेत ही युती तुटली आहे. इथं भाजप स्वबळावर निवडणूक लढणार आहे. तर शिवसेना शिंदे गट या ठिकाणी ओमी कलानी आणि साई पक्षासोबत निवडणूक लढेल. मीरा भाईंदर महापालिकेत ही युती होण्यात अडचणी निर्माण झाल्या. या ठिकाणी ही युती तुटली आहे. भाजप सेना वेगळे लढणार आहेत.
ही लिस्ट आणखी मोठी आहे. अकोला महापालिकेत भाजप आणि शिवसेना वेगळे लढणार आहेत. पण त्याच वेळी भाजप सोबत राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे. अमरावती महापालिकेतही युती होवू शकली नाही. अर्ज दाखल करण्याच्या आदल्या रात्रीपर्यंत या ठिकाणी चर्चा सुरू होती. पण तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा अमरावतीत दिला आहे. इथं राष्ट्रवादी ही स्वबळावर लढणार आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर या मराठवाड्यातील दोन मोठ्या महापालिकांमध्ये युती होईल असं वाटत होतं. पण तिथे ही युतीचं पटलं नाही. दोन्ही ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढणार आहे.
या शिवाय धुळे, सांगली मिरज कुपवाड, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नांदेड आणि लातूर या महापालिकांमध्ये ही महायुती झालेली नाही. या ठिकाणी ही शिवसेना आणि भाजप आमने सामने ठाकले आहेत. स्थानिक समिकरणे लक्षात घेवून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी इथं सेना भाजप वेगळे लढत आहेत. पुणे महापालिके शिवसेना भाजप एकत्र असले तरी महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गट मात्र वेगळे लढत आहेत. तर मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नागपूर या महत्वाच्या आणि मोठ्या महापालिकेत मात्र युती बाबत एकमत झाले आहे. इथं युती म्हणून हे दोन्ही पक्ष लढणार आहेत.
कोणत्या महापालिकेत युतीत तुटली?
- 1)नवी मुंबई
- 2)उल्हासनगर
- 3)मीरा भाईंदर
- 4)अकोला
- 5)अमरावती
- 6)जालना
- 7) छत्रपती संभाजी नगर
- 8) धुळे
- 9)सांगली मिरज कुपवाड
- 10)पिंपरी चिंचवड
- 11) सोलापूर
- 12)नांदेड
- 13)लातूर
या महापालिकेत युती भक्कम
- 1) मुंबई
- 2) कल्याण डोंबिवली
- 3) ठाणे
- 4)वसई विरार
- 5)पनवेल
- 6)चंद्रपूर
- 7)नागपूर
- 8)कोल्हापूर