- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात राजकीय पक्षांनी खासगी जासूसांची मदत घेणे सुरू केले आहे
- जासूसांना उमेदवारांच्या वैयक्तिक, व्यावसायिक माहितीचा शोध घेणे आणि मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यास सांगितले जाते
- निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या नेत्यांवर नजर ठेवणे आणि पक्षांतर टाळण्यासाठी जासूसांना नेमले जातात
पारस दामा
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा (BMC Election 2026) रणसंग्राम आता अधिक तांत्रिक आणि गुप्त झाला आहे. केवळ सभा आणि सोशल मीडिया मार्केटिंगवर अवलंबून न राहता, राजकीय पक्षांनी आता आपल्या विरोधकांच्या आणि स्वपक्षातील संभाव्य बंडखोरांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 'प्राइवेट डिटेक्टिव्ह' म्हणजेच खासगी जासूसांची फौज तैनात केली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी प्रत्येक जागा जिंकण्यासाठी पक्षांकडून असे 'अदृश्य' डावपेच आखले जात आहेत. त्यांचा पडद्यामागे खतरनाक खेळ सुरू आहे.
प्रसिद्ध महिला जासूस रजनी पंडित यांच्या मते, निवडणुकांच्या काळात राजकीय चौकशीच्या कामांमध्ये मोठी वाढ होते. तिकीट कापले गेल्यामुळे नाराज असलेले नेते, पक्षांतराच्या तयारीत असलेले पदाधिकारी आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कमकुवत बाजू शोधण्यासाठी जासूसांना पाचारण केले जाते. यासाठी 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतचे शुल्क आकारले जाते. हे करत असताना तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. उमेदवाराची पार्श्वभूमी तपासणे, मोबाईल लोकेशन ट्रॅक करणे आणि अंडरकवर एजंट्सच्या माध्यमातून प्रचार रॅलींमधील हालचाली टिपणे ही आव्हानात्मक कामे या जासूसांना दिली जात आहेत.
मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी चाललेली ही 'इंटेलिजन्स वॉर' सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.जासूसांचे 'टार्गेट' काय असते हे ही तितकेच रोचक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जासूसांकडे विशिष्ट टास्क सोपवण्यात आले आहेत. यात प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील संवेदनशील माहिती काढणे, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या संपर्कावर लक्ष ठेवणे आणि सोशल मीडियावरील एक्टिव्हिटी तपासणे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आपली स्वतःची माणसे दगा तर देणार नाहीत ना, याची खात्री करण्यासाठीही काही पक्ष जासूसांचा वापर करत आहेत.
एका उमेदवाराच्या जासूसीसाठी मोठी रक्कम खर्च केली जात आहे. मुंबईसारख्या श्रीमंत महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी हा 'गुपीत मार्ग' आता निवडणुकीचा अविभाज्य भाग बनला आहे. भारतातील पहिल्या महिला जासूस रजनी पंडित यांनी सांगितले की, निवडणुका जाहीर झाल्यापासून अशा चौकशीच्या केसेसमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केवळ उमेदवारच नाही, तर राजकीय पक्ष देखील आपल्या पक्षांतर्गत हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जासूसांची नेमणूक करत आहेत. अशा प्रकारे, मुंबई महापालिकेच्या रणांगणात आता प्रत्यक्ष संघर्षासोबतच पडद्यामागे एक मोठी गुप्तहेर यंत्रणा सक्रिय झाली आहे.
काय आहे जासूसांचे काम?
- उमेदवाराचा संपूर्ण इतिहास खणून काढणे.
- मोबाईल लोकेशन्स आणि गुप्त बैठकांचा मागोवा घेणे.
- प्रचार मोहिमेदरम्यान अंडरकवर राहून प्रतिस्पर्ध्याच्या रणनीतीचा शोध घेणे.