- सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजकीय घराण्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो
- माळशिरस, माढा, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांमध्ये अनेक उमेदवार हे राजकीय कुटुंबातील सदस्य आहेत
- सोलापूरच्या ११ तालुक्यांपैकी सात तालुक्यांमध्ये राजकीय घराण्यांचे वर्चस्व असून १४ उमेदवार हे घराण्यांतील आहेत
संकेत कुलकर्णी
राजकारणात नेत्यासाठी झटणारे कार्यकर्ते असंख्य असतात. तसंच झटणाऱ्या कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी देऊन मोठं करण्याचं काम हे नेत्याला करावं लागतं. मात्र तसं आज काल होतं का? याचं उत्तर नाही असचं होतं. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पदरात सतरंज्याच उचलणं येत असं चित्र आहे. मग कधी त्या दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्याच्या असो किंवा आपल्याच पक्षातील नेत्यांच्या मुलांच्या असो. म्हणूनच सध्या संतरंज्या उचलणारे हे जणू एक पदच झाले आहे. सगळीकडे घराणेशाहीचाच बोलबाला दिसतो. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ता मात्र मागे फेकला जातो. तसेच काहीसे चित्र सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकी निमित्ताने पाहायला मिळत आहे. इथं घराणेशाहीचा बोलबाला स्पष्ट पणे दिसत आहे.
माळशिरस तालुक्यात अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि वैष्णवीदेवी मोहिते पाटील हे दोन उमेदवार मोहिते पाटलांच्या घरातून जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहेत. अर्जुनसिंह हे विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे आहेत. तर वैष्णवीदेवी या त्यांच्या सून आहेत. तर आमदार उत्तम जानकर यांचा मुलगा जीवन उत्तम जानकर हे ही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते या देखील निवडणूक लढणार आहेत.माढा तालुक्याचं चित्र ही काही वेगळं नाही. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. तर धनंजय सावंत स्वतंत्र निवडणूक लढणार आहेत. माजी आमदार श्यामल बागल यांची कन्या रश्मी दिगंबर बागल यांनाही करमाळ्यातून उमेदवारी मिळाली आहे. तर सांगोला तालुक्यात माजी आमदार दिपक साळुंखे यांचे पुत्र यशराजे साळुखे झेडपीच्या रिंगणात आहेत.
पंढरपूर तालुक्यात कल्याण काळे यांची भावजय मोनिका काळे आणि दिवंगत आमदार भारत भालके यांची सून रुपाली भालके यांनाही उमेदवारी मिळाली आहे. अक्कलकोट तालुक्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, बंधू सागर कल्याणशेट्टी यांना उमेदवारी मिळाली आहे. तर माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे पुत्र शिवराज म्हेत्रे यांनाही संधी मिळाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र पृथ्वीराज माने आणि माजी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजीत पवार यांना उमेदवारी मिळाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी सात तालुक्यात घराणेशाहीचं चित्र आहे. एकूण 14 उमेदवार हे राजकीय कुटुंबातले आहेत. त्यामुळे सोलापूरच्या घराणेशाहीतून आपला राजकीय वारस बळकट करण्याचं काम सुरू आहे.
मात्र आमदारांचा मुलगा सक्षम असेल तर उमेदवारी द्यायला हरकत नसल्याचं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं आहे. तर अक्कलकोट येथील कार्यकर्त्यांनी आपण जनसंघापासून काम करतोय, तरीही उमेदवारी नसल्याचा आरोप पक्षावर केला आहे. मुळात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजवर घराणेशाहीचाच बोलबाला राहिला आहे. अनेक नेत्यांनी इथे आपले राजकीय गड उभे केले आहेत. पिढ्यानपिढ्या राजकीय वारसा पुढे नेण्याची तरतूद करून ठेवली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून कार्यकर्ते आणि पक्ष संघटनेला बळ मिळतं. मात्र राजकीय घराण्यांनी आपले वारसदार निवडणुकीत पुढे केले आहेत. त्यामुळे इथेही कार्यकत्यांना सतरंज्या उचलण्यातच धन्यता मानावी लागणार आहे.