एक'नाथ' है तो सेफ है, सेना नेत्याच्या ट्वीटनं ट्विस्ट

भाजप हा महायुतीत सर्वात मोठा पक्ष ठरल्याने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? याचे उत्तर राज्यातल्या जनतेला अजूनही मिळालेले नाही. 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला. त्यानंतर तीन दिवस झाले तरी महायुतीचे अजूनही मुख्यमंत्री कोण? यावर एकमत झालेले नाही. भाजप हा महायुतीत सर्वात मोठा पक्ष ठरल्याने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होण्यास इच्छुक आहेत. ते आपला दावा सोडायला तयार नाहीत. त्यामुळेच पेच फसला असून तोडगा निघालेला नाही. त्यात आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटने मात्र ट्विस्ट निर्माण झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या आहेत. त्यामुळे नव्या सरकारचे नेतृत्व त्यांनीच करावे असे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना वाटत आहे. त्यात आता शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी एक'नाथ' है तो सेफ है असं सुटक वक्तव्य केलं आहे. त्यातून त्यांनी अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची भूमीका स्पष्ट आहे. ते सहजासहजी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडण्यास तयार नाहीत हे यातून स्पष्ट होत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'मुख्यमंत्री कोण होणार हे आधी ठरवा, मगच दिल्लीत या' भाजप श्रेष्ठींचा आदेश, टेन्शन कोणाचं वाढणार?

पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही या आधी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहीजे अशी भूमीका मांडली होती. पणअंतिम निर्णय महायुतीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख घेतील. दिल्लीत जो निर्णय होईल तो आम्हा सर्वांना मान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. एकीकडे जो निर्णय होईल तो मान्य असेल असं सांगितलं जात असलं तरी दुसरीकडे मात्र शिंदे गटाचे दबावतंत्रही सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद असावे असं बोललं जातय. शिवाय अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्यूल्याचीही चर्चा आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री कोण आणि शपथविधी कधी? रावसाहेब दानवे यांनी सांगितला महायुती सरकारचा प्लान

तर दुसरीकडे भाजप मात्र आता त्यागाच्या भूमीकेत दिसत नाही. 130 पेक्षा जास्त आमदार भाजपचे निवडून आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आपलाच असावा अशी भाजपची भूमीका आहे. भाजप नेतेही त्याबाबत खुले पणाने बोलले आहेत. अशा वेळी दिल्लीतील श्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर मुख्यमंत्री कोण होणार याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचे लक्ष लागले आहे. त्यात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पाठिंबा देवू केला आहे. अशा स्थितीत शिंदे आपली मागणी किती मोठ्या प्रमाणात रेटतात हे ही महत्वाचे ठरणार आहे. 

Advertisement