Maharashtra Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालीय. त्यानंतर कोणत्या आघाडीला सत्ता मिळणार? तसंच कोण मुख्यमंत्री होणार? हे सर्वांपुढचे प्रश्न आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत. या प्रत्येक पक्षात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे त्यापैकी कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार? याची सर्वांना उत्सुकता आहे.
कुठे होणार शपथविधी?
नवा मुख्यमंत्री कोण होणार? त्याचबरोबर मुख्यमंत्री कुठे शपथ घेणार? याची सर्वांना उत्सुकता असते. मुख्यमंत्री कुठं शपथ घेणार हे अद्याप स्पष्ट नाही. नवे मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती राजभवनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया' ला दिली आहे.
( नक्की वाचा : Maharashtra Election Result 2024 : राज ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई, अन्यथा होईल मोठी नामुश्की )
यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर उद्धव ठाकरे यांनी 2019 साली शिवाजी पार्कमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. महायुती किंवा महाविकास आघाडी यांना स्पष्ट बहुमत मिळालं तर शपथविधीची प्रक्रिया सोपी असेल.
महायुती किंवा महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर या आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करेल. त्यानंतर राज्यापाल त्या आघाडीच्या नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी प्राचारण करतील.
कुणालाच बहुमत मिळालं नाही तर काय होणार?
महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये कुणालाही बहुमत मिळालं नाही तर सरकार स्थापनेमध्ये राज्यपालाची भूमिका महत्त्वाची असेल. त्या परिस्थितीमध्ये राज्यपाल सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी प्राचारण करु शकतात. त्या नेत्यानं राज्यपालांचं निमंत्रण स्विकारलं तर राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत नव्या नेत्याला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सर्वाधिक जागा मिळणाऱ्या पक्षानं राज्यपालांचं निमंत्रण स्विकारलं नाही तर राज्यापाल दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापनेसाठी प्राचारण करु शकतात. कोणत्याही पक्षानं किंवा आघाडीनं सरकार स्थापनेचं आमंत्रण स्विकारलं नाही किंवा त्यांना बहुमत सिद्ध करण्यास अपयश आलं तर राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. सध्याच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मोजकेोच दिवस शिल्लक आहेत.