भन्नाट ऑफर! मतदान करा... बोटाची शाई दाखवा... मोफत केस कापा...

जाहिरात
Read Time: 2 mins
अकोला:

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लवकरच मतदान होणार आहे. पण अनेक जण मतदान करण्यास उत्सुक नसतात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरते. मतदानाचा हा टक्का वाढावा म्हणून अकोल्याच्या अनंता कौलकार या केशकर्तनकारानं एक भन्नाट आयडीया केलीय. जो मतदान करेल, त्यानंतर मतदान केले आहे, याची निशाणी म्हणजेच बोटावर शाही लावल्याचे दाखवेल त्याचे मोफत केस कापले जातील, अशी ऑफरच त्याने देऊ केली आहे. शिवाय त्यासाठी कालमर्यादाही ठेवण्यात आली आहे. याची जाहीरातही त्याने आपल्या सलून बाहेर केली आहे.  

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 
महाराष्ट्रात लोकसभेसाठी पाच टप्प्यात मतदान होत आहे. अकोला लोकसभेसाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे. याच अकोल्यात अनंता कौलकार यांचे सलुन आहे. यांनीच  मतदान जनजागृतीसाठी एक 'हटके' पाऊल उचलले आहे. मतदान करणाऱ्या अकोलेकरांना अनंतानं एक भन्नाट ऑफर दिलीये. मतदान करा अन् आपल्या सलूनमध्ये मोफत कटींग करून जा अशी ही ऑफर आहेय. अकोल्याच्या रामदासपेठ भागात अनंता कौलकार यांचे हे सलून आहे. मतदानाची टक्केवारी  कमी होत आहे. मतदान जास्तीत जास्त झाले पाहीजे हा यामागचा उद्देश असल्याचे अनंता सांगतात.  

अनंता नेहमीच चर्चेत 
अनंता संपुर्ण अकोल्यात नेहमीच चर्चेत असतो. त्याचे कारण म्हणजे ते राबवत असलेले सामाजिक उपक्रम. लोकसभेसाठी 'मतदान करा' म्हणत अकोलेकरांना अनंताने अनोख्या पद्धतीनं साद घातली आहे. बरं, तो फक्त मतदारांना मतदानाचं आवाहनच करून थांबला नाहीय. तर मतदान करणाऱ्यांनी बोटावर मतदान केल्याची शाई दाखवायची, अन् मोफत कटींग करून जायचंय असा हा त्याचा उपक्रम आहे. त्यामुळे अकोलकरांनाही त्याचे कौतूक वाटत आहे. शिवाय त्यांच्या मनातही मतदान केले पाहीजे ही भावना तयार होत आहे. 

अकोल्यात 26 एप्रिलला मतदान 
अकोला लोकसभेसाठी 26 एप्रिलला मतदान होत आहे. या मतदार संघात तिरंगी लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉ.अभय पाटील हे रिंगणात आहेत. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना या सर्वांनीच मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

Advertisement