लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. राज्यात पहिल्या दोन टप्प्यातले मतदानही आटोपले आहे. त्यात बुलढाणा लोकसभा मतदार संघाचाही समावेश आहे. आता याच मतदार संघातून कोण जिंकणार आणि कोण हरणार यावर पैज लावली जात आहे. विशेष म्हणजे ही पैज कोणी मतदाराने नाही तर चक्क माजी मंत्र्यांनी लावली आहे. पैज जिंकली तर या माजी मंत्र्याला 9 लाख मिळणार आहेत. तर पैज हरल्यावर सव्वा तीन लाख रूपये द्यावे लागणार आहेत. त्यांच्या या पैजेची चर्चा आता संपुर्ण बुलडाणा लोकसभा मतदार संघात रंगली आहे. मात्र पैज कोण जिंकणार यासाठी सर्वांना 4 मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माजी मंत्र्याने लावली 9 लाखाची पैज
बुलढाणा लोकसभेसाठी 26 तारखेला मतदान झाले. त्यानंतर मतदार संघात कोण जिंकणार अशी चर्चा चांगलीच रंगली आहे. इथे शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाचे नरेंद्र खडेकर आणि अपक्ष रविकांत तुपकर यांच्यात ही तिरंगी लढत होत आहे. यामध्ये विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे पराभूत होतील अशी पैजच माजी महसूल राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी लावली आहे. जर पैज हरले तर ते समोरच्या व्यक्तीला 9 लाख देणार आहेत. मात्र जिंकले तर सव्वा तिन लाख त्यांना मिळणार आहेत. सावजी हे सध्या निवडणुक आटपल्यानंतर मुंबईत आहेत. यावेळी त्यांनी ही पैस त्यांच्या मित्रा बरोबर लावली आहे. मुंबईत कोण जिंकणार कोण हरणार याची चर्चा सुरू होती. त्यावेळी त्यांनी ही पैज लावली आहे. शिवाय पैज लावली असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च दिली आहे. त्यांच्या या पैजेची चर्चा सगळीकडे रंगली आहे.
हेही वाचा - ठाकरेंच्या सभेआधी राणेंची धमकी, कोकणातलं वातावरण तापलं
सावजी आपल्या अनोख्या अंदाजासाठी फेमस
माजी महसूल राज्य मंत्री म्हणून सुबोध सावजी यांनी काम पाहिले आहे. ते जिल्ह्यातील काँग्रेलचे जेष्ठ नेते आहेत. सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडूनही गेले. एकदा त्यांना मंत्रीपदाची संधीही मिळाली. या आधीही सावजी हे आपल्या अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत राहीले आहेत. भाजपचे आमदार राम कदम यांच्या 'महिलांचे अपहरण' या वक्तव्यावरून कदम यांची जीभ कापणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी ही यांनीच दिली होती. शिवाय जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांचा खून करण्याची धमकीही त्यांनी दिली होती.
'प्रतापराव जाधवांचा पराभव निश्चित'
बुलढाणा लोकसभेत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा सुबोध सावजी यांनी केला आहे. मतदार संघात फिरल्यानंतर, लोकांबरोबर चर्चा केल्यानंतर हे वक्तव्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले. बुलढाणा लोकसभेत तिरंगी लढत होत आहे. प्रतापराव जाधव यांच्यासह ठाकरे गटाचे नरेंद्र खडेकर आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात ही लढत होत आहे. तिघांनीही आपल्या विजयाचा दावा केला आहे.