Hingoli Lok Sabha 2024 : 2 शिवसैनिकांच्या लढतीत हिंगोलीकर परंपरा कायम राखणार?

Hingoli Lok Sabha 2024 : मराठवाड्यातील हिंगोली मतदारसंघ विद्यमान खासदाराला पुन्हा निवडून न देण्याच्या ट्रेंडसाठी राज्यात ओळखला जातो.

जाहिरात
Read Time: 3 mins
Baburao Kadam Kohalikar vs Nagesh Patil Ashtikar : हिंगोलीकर यंदा परंपरा कायम राखणार का?
हिंगोली:

मराठवाड्यातील हिंगोली मतदारसंघ विद्यमान खासदाराला पुन्हा निवडून न देण्याच्या ट्रेंडसाठी राज्यात ओळखला जातो. 1991 पासून हिंगोलीमध्ये एकही खासदार सलग दोनदा विजयी झालेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हिंगोलीत जाहीर झालेला उमेदवार बदलण्याची शिवसेनेवर नामुश्की आली होती.

शिवसेनेनं सुरुवातीला विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली. हेमंत पाटील विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर असा सामना रंगणार असं वाटत होतं. पण, हेमंत पाटील यांची उमेदवारी मागं घेत शिवसेनेनं बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली. हिंगोली मतदारसंघ भाजपाला न सोडण्यात शिंदे यशस्वी झाले असले तरी भाजपाच्या दबावामुळे त्यांनी उमेदवारी बदलली अशी चर्चा होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शिवसैनिकांमधील लढत

ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे ग्रामपंचायत पातळीपासून पुढं आलेलं नेतृत्त्व आहे. ते हदगाव विधानसभा मतदारसंघातून 2014 साली विजयी झाले होते. त्यामुळे त्यांचा या भागात जनसंपर्क चांगला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचं या मतदारसंघावर एकेकाळी वर्चस्व होतं. 2014 मधील मोदी लाटेतही हिंगोलीची जागा जिंकण्यात काँग्रेसला यश मिळालं होतं. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय नेते दिवगंत राजीव सातव हिंगोलीमधून विजयी झाले होते. यंदा महाविकास आघाडीत ही जागा आपल्याकडं राखण्यात ठाकरे गटाला यश आलं. नागेश पाटील यांचा सामना दुसरे शिवसैनिक बाबूराव कदम कोहळीकर यांच्याशी झाला.

( नक्की वाचा : ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला जानकरांचं तगडं आव्हान, कोण होणार खासदार? )
 

मतदारसंघाची रचना आणि मुद्दे

हिंगोली मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी, नांदेड जिल्ह्यातले हदगाव आणि किनवट तर यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड मतदारसंघाचा समावेश होतो. यामधील कळमनुरी, हदगान आणि किनवट या मतदारसंघात आदिवासी मतदारांची संख्या मोठी आहे.

Advertisement

सध्या सहापैकी तीन ठिकाणी भाजपा (हिंगोली, उमरखेड, किनवट) राष्ट्रवादी काँग्रेस (वसमत), शिवसेना, शिंदे गट (कळमनुरी) तर हदगाव मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार आहे. सहापैकी पाच मतदारसंघ महायुतीच्या तर एक मतदारसंघ हा महाविकास आघाडीकडं आहे. मतदारसंघात भाजपाचे तीन आमदार असल्यानंच पक्षाचा यावर दावा होता. भाजपाला जागा आपल्याकडं खेचण्यात यश आलं नसलं तरी उमेदवार बदलण्यात यश आलं असं मानलं जातंय. 

हिंगोली मतदारसंघात ग्रामीण भागाचा समावेश आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राशी मुद्दे महत्त्वाचे आहेत. सिंचन व्यवस्था, मोठ्या कृषी उद्योगाचा अभाव, रोजगार, आरोग्य सुविधा हे मुद्दे या निवडणुकीत चर्चेत होते. 

Advertisement

( नक्की वाचा : Beed Lok Sabha 2024 : जरांगे की मुंडे फॅक्टर भारी? 'बीड' च्या गडावर कुणाचा झेंडा? )
 

किती झालं मतदान?

हिंगोलीमध्ये 2019 साली 66.84 टक्के मतदान झालं होतं. यंदा हा टक्का घसरुन 63.54 टक्के मतदान झालंय. वसमतमध्ये 62.54, हदगावमध्ये 65.53, हिंगोली 59.92, कळमनुरी 63.60, किनवट 65.86 आणि उमरखेडमध्ये 64.37 टक्के मतदान झालं. या घटलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला होणार? एका पक्षाचा उमेदवार दोन वेळा निवडून न देण्याची या शतकातील परंपरा हिंगोलीकर कायम राखणार का? या प्रश्नाचं उत्तर चार तारखेला मिळणार आहे.