राज्यातील किती गावांचा निवडणुकीवर बहिष्कार? कोणत्या मतदारसंघात अधिक रोष?

जाहिरात
Read Time: 3 mins
Mumbai:

राज्यात लोकसभा निवडणुकांचं  बिगुल वाजलं आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून अधिकाधिक मतदान करण्यासाठी मतदारांना वेळोवेळी आवाहन केली जात आहेत. तर अनेक उपाययोजनाही राबवल्या जात आहेत. मात्र, असं असलं तरी देखील राज्यातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यातील किती गावांचा बहिष्कार? 
राज्यात तब्बल 65 गावातील  41 हजार 440 मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. रस्ते, पाणी, मराठा आरक्षण, रेल्वे गाडी सुरू करावी यासाठी हा बहिष्कार घालण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील एका गावानं तर चक्क त्यांच्या गावातील मोबाईल टॉवरसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

...म्हणून या गावचा निवडणुकीवर बहिष्कार 
आष्टी तालुक्यातील सुरूर्डी येथे गेल्या वीस वर्षांपासून मोबाईलला रेंज मिळत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भातील ठरावच ग्रामपंचायतीमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आला आहे. प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करुन देखील कोणत्याच कंपनीचे टॉवर परिसरात बसवण्यात आलेलं नाहीत. त्यामुळे गावात मोबाईलला रेंज नसल्यानं गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ टॉवर बसवून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत गावात मोबाईलला रेंज मिळत नाही. तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमतानं घेतला आहे. 

रस्त्याची कामं, जमिनीच्या अधिग्रहणासाठी बहिष्कार 
मावळ मतदारसंघात रस्त्याच्या कामांसाठी कोंडीची वाडी येथील 70 ते 80 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर, जमिनीच्या अधिग्रहणाच्या मोबदल्यासाठी हनुमान कोळीवाडा आणि करंजा गावातील 400 ते 450 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. 

Advertisement

रस्ते, लाईट, पाणी, आरोग्य, पुनर्वसनासाठी बहिष्कार 
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी रस्ते, पाणी, लाईट आणि आरोग्य या मूलभूत सुविधा नसल्यानं फुगाळे आणि दापूर येथील 3 हजार 466 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात सिडकोनं जमिन अधिग्रहण करूनही काम पूर्ण न केल्यानं जमिन परत करण्याच्या अन्यथा पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी सावली गावातील 15 ते 20 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. 

मोकाट जनावरांना आळा घाला 
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. बारामती म्हणजे, पवार आणि पवार म्हणजे, बारामती, असं समीकरण गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र अनुभवतोय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण याच बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार नाराज आहे. ते मोकाट जनावरांच्या समस्येनं. याच मुद्द्यावरुन आक्रमक होत, गावकऱ्यांनी थेट मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोकाट जनावरांमुळे शेतीचे नुकसान होत, असल्यानं उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी मोढवे गावातील 2 हजार 700 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. 

Advertisement

मराठा आरक्षण द्या 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पान्हवळ गावातील 1200 ते 1300 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी लाहोरा तालुक्यातील होळी गावातील 500 ते 600 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. तसेच, दौंड शहराला उपनगरचा दर्जा द्यावा, लोकल सुरू करावी आणि उड्डाण पुलाच्या मागणीसाठी 3 हजार ते 3 हजार 500 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. शिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शिरुरमधली निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच भुयारी मार्गाच्या मागणीसाठी खोडद, हिवरे, नारायणगाव गावातील 1200 ते 1300 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

उपसा सिंचन योजनेसाठी निधी द्या
माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी उपसा सिंचन योजनेसाठी निधी मंजूर करण्याच्या मागणीसाठी 35 ते 40 गावातील 20 हजार ते 25 हजार मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी रस्त्याच्या मागणीसाठी औरंगपूर गावातील 70 मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. 

Advertisement