पराभवाची की विजयाची हॅटट्रिक? सिंधुदुर्ग-रत्नागिरीत मतदार कोणाच्या बाजूने?

राणेंना या मतदार संघात सलग दोन वेळा पराभवाचा सामना कारावा लागला आहे. तर विनायक राऊत हे सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे पराभवाची की विजयची हॅट्रीक होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Advertisement
Read Time: 4 mins
रत्नागिरी:

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघात राणे विरूद्ध राऊत अशी लढत झालीय. शिवसेना ठाकरे गटाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समोर चांगलेच आव्हान उभे केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही रत्नागिरीत जाहीर सभा घ्यावी लागली होती. तर उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्यासाठी जोरदार प्रचार केला. त्यामुळे या मतदार संघात रंगत वाढली आहे. राणेंना या मतदार संघात सलग दोन वेळा पराभवाचा सामना कारावा लागला आहे. तर विनायक राऊत हे सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे पराभवाची की विजयची हॅट्रीक होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मताधिक्य घटले, फायदा कोणाला होणार? 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात यावेळी जवळपास 59.23 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मात्र 2019 सालच्या तुलनेत हे मतदान जवळपास सहा टक्क्यांनी कमी आहे. 2019 ला या मतदार संघात 65.06 टक्के मतदान झाले होते. हा घटलेला मतांचा टक्का कोणाचे गणित बघडवणार याची रंगतदार चर्चा मतदार संघात होत आहे. शिवसेनेच्या फुटी नंतर हा मतदार संघ शिंदे गटाला मिळावा यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते. त्यामुळे नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर व्हायला उशीर झाला. तो पर्यंत विनायक राऊत यांनी प्रचारात मुसंडी मारल्याचे चित्र होते. या मतदार संघात भाजपचा एक आमदार आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार आहेत. शिंदे गटाचे दोन तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आमदार आहे. त्यामुळे राणे यांची भिस्त शिंदे गटाच्या आमदारांवर आहे. 

Advertisement

प्रचार कोणते मुद्दे गाजले?  

सिंधुदुर्ग रत्नागिरीत प्रचाराची जोरदार राळ उठली होती. राणेंनी सर्व सत्तापदे भोगूनही जिल्ह्याचा काय विकास केला हा मुद्दा चांगलाच गाजला. शिवाय केंद्रात मंत्री असून किती उद्योग कोकणात आणले अशी विचारणाही विरोधकांकडून केली जात होती. राणे आणि त्यांच्या कुटुंबानी स्वत: चा फायदा करून घेतला असाही आरोप केला गेला. राणेंना तर उद्धव ठाकरे यांनी थेट शिंगावर घेत प्रचाराचा पारा चांगलाच वाढवला होता. राणेंच्या गडात जाऊन राणेंना डिवचण्यात आले.  राणेंना जशाच तसे उत्तर देण्याची रणनिती शिवसेनेने आखली होती. राणें विरोधात शिवसेनेने आक्रमक प्रचार केला. त्यामुळे राणे काही काळ बॅकफूटवर दिसले. तर दुसरीकडे मोदींनी केलेलं काम, कोकणावर आपले असलेले प्रेम, कोकणाने आता पर्यंत भरभरून दिले हे आपल्यावर उपकार असल्याचे राणे प्रचारात सांगत होते. शिवाय मतदान करण्याची भावनिक सादही घालत होते. मोदींच्या नावाने जरी मत मागितली जात असली तरी स्थानिक मुद्द्या भोवती निवडणूक फिरत होती. कोकणात बेरोजगारीचा मुद्दा आहेच. विनाशकारी प्रकल्प येत आहे त्यावरही चर्चा झाली. मुंबई गोवा हायवेचाही विषय या निमित्ताने चर्चीला गेला. विनायक राऊत यांनी दहा वर्षात मतदार संघात काहीच केले नाही असाही आरोप यावेळी प्रचारात झाला. 

Advertisement

मतदार संघातली राजकीय स्थिती काय? 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यातील तिन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत तर तिन  रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. सावंतवाडी शिंदे गटाचे दीपक केसरकर प्रतिनिधीत्व करतात. तर कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे वैभव नाईक आमदार आहे. कणकवली हा मतदार संघ नितेश राणे हे भाजपचे आमदार आहे. रत्नागिरीत मंत्री उदय सामंत, राजापूरात शिवसेना ठाकरे गटाचे राजन साळवी तर चिपळूणमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेखर निकम हे आमदार आहेत. तसे पाहात हा मतदार संघ शिवसेनेचा गड राहीला आहे. राणेंचीही ताकद बऱ्यापैकी आहे. मात्र यानिवडणूकीत राणेंना शिंदेंच्या शिवसेनेची मदत लागणार आहे. शिवाय हा मतदार संघ भाजपला गेल्याने शिंदे गटातील काही कार्यकर्ते हे नाराज आहेत. तर भाजपमधलाही एक गट राणेंच्या उमेदवारीमुळे नाराज झाला होता. मतदार संघाचा विचार करता भाजपचा केवळ एक आमदार या मतदार संघात आहे. तर ठाकरेंचे दोन आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. एक आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यामुळे राणेंची सर्व मदार ही शिवसेना शिंदे गटावर असणार आहे. 

Advertisement

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघाचा इतिहास

या मतदार संघाचे पुर्वीचे नाव हे राजापूर लोकसभा मतदार संघ असे होते.  हा मतदार संघातून नाथ पै, मधुदंडवते या दिग्गजांनी प्रतिनिधीत्व केले आहे. कधी काळी हा मतदार संघ समाजवाद्यांचा गड होता. 1957 ते 1991 या काळात या मतदार संघावर समाजवाद्यांचा बोलबाला होता. 1991 ला काँग्रेसने इथे बाजी मारली. त्यानंतर 1996 पासून 2009 पर्यंत इथे शिवसेनेचा खासदार राहीला आहे. 2009 चा अपवाद वगळता पुन्हा हा मतदार संघ शिवसेनेने आपल्याकडे खेचून आणला. काँग्रेसलाही या मतदार संघाने साथ दिली होती. पण खऱ्या अर्थाने हा मतदार संघ शिवसेनेचा गड राहीला आहे. सुरेश प्रभू यांनी या मतदार संघाचे शिवसेनेकडून चार वेळा प्रतिनिधित्व केले. त्यानंतर विनायक राऊतही दोन वेळा निवडून आले. काँग्रेसकडून सुधिर सावंत आणि निलेश राणे यांना एकदा संधी मिळाली होती. शिवसेनेच्या सतत मागे राहाणार हा मतदार संघ म्हणून याची ओळख आहे. मात्र आता शिवसेनेत फुट पडली आहे. शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे कोकणी माणूस कोणत्या शिवसेनेला साथ देतो हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.