भाजपाच्या बालेकिल्ल्यात जरांगे फॅक्टरचा बोलबाला, वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला?

Jalna Lok Sabha Election : निवडणुकीच्या मैदानात दानवे विरुद्ध काळे अशी थेट लढत असली तरी प्रत्यक्षात मनोज जरांगे फॅक्टर किती निर्णायक ठरणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Advertisement
Read Time: 3 mins
जालना:

Jalna Lok Sabha 2024 : मराठवाड्यात भाजपाला नेहमी साथ देणाऱ्या मतदारसंघात जालनाचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे इथं 1999 पासून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. त्यापूर्वी उत्तमसिंग पवारही दोन वेळा भाजपाकडून विजयी झाले आहेत. गेल्या दोन निवडणुकीत सहज विजय मिळवणाऱ्या दानवेंना यंदा काँग्रेसच्या कल्याण काळे यांचं आव्हान आहे. निवडणुकीच्या मैदानात दानवे विरुद्ध काळे अशी थेट लढत असली तरी प्रत्यक्षात मनोज जरांगे फॅक्टर किती निर्णायक ठरणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

जरांगे फॅक्टर महत्त्वाचा का?

मराठा आरक्षणाच्या मागणीवर गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. या मागणीसाठी आमरण उपोषण करुन राज्याचं लक्ष वेधाणारे मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातलेच आहेत. जालनाजवळच्या अंतरवली सराटीमधूनच त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. या अंदोलनाची व्याप्ती संपूर्ण राज्यात वाढल्यानंतरही अंतरवली सराटी हेच याचं केंद्र होतं. जरांगे यांच्यासोबत असलेला मराठा समाज या निवडणुकीत काय भूमिका घेतो हे निर्णायक ठरणार आहे. 

मराठा समाजाच्या आंदोलनाचा फटका आपल्याला बसणार नाही, असा दावा दोन्ही उमेदवारांनी केलाय. त्याचवेळी दलित, मुस्ली, माळी, वंजारी आणि इतर ओबीसी मतदारांना आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला आहे. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने तब्बल 77 हजार मते मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या अटितटीच्या लढतीमध्ये वंचितचे उमेदवार प्रभाकर बकले  किती मते घेतात यावर देखील विजयाची गणितं अवलंबून असतील.

( नक्की वाचा : जरांगे की मुंडे फॅक्टर भारी? 'बीड' च्या गडावर कुणाचा झेंडा? )
 

मतदारसंघातील समीकरण

जालना लोकसभा मतदारसंघात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 3 (सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण) आणि जालना जिल्ह्यातील 3 ( जालना, बदनापूर, भोकरदन) या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यापैकी फक्त जालना शहरात काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल आमदार आहेत. तर अन्य पाच मतदारसंघात सध्या महायुतीचे आमदार आहेत. महायुतीमध्ये भाजपा 3 आणि शिवसेना 2 असं सध्या संख्याबळ आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : 2 शिवसैनिकांच्या लढतीत हिंगोलीकर परंपरा कायम राखणार? )
 

मतदारसंघातील प्रश्न 

जालना शहराला असलेल्या उद्योगांच्या पार्श्वभूमीमुळे 'जालना, सोने का पालना' ही म्हण प्रचलित आहे. त्यानंतरही शहराला वेगवेगळ्या समस्यांचा विळखा आहे. कोट्यावधी रुपये खर्चून जालना शहरासाठी जायकवाडी धरणातून पाणी आणलं, पण नियोजन आणि साठवणुकीचा अभाव असल्यानं शहरात पाण्याचा प्रश्न कायम आहे. शहरात मेडिकल कॉलेज मंजूर झालंय पण इमारतीच्या बांधकामाला अजूनही सुरुवात झालेली नाही.

 जालना जिल्ह्यात कृषी उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे  कृषीमाल,फळे भाजीपाला यांची निर्यात करता यावी यासाठी गेल्या 10 वर्षांपासून ड्रायपोर्ट तयार करण्यात आलाय. त्यांचं उदघाटन देखील अलीकडच्या काळात झालं. पण, हा प्रकल्प अजूनही कार्यान्वित झालेला नाही. जालना-खामगाव रेल्वे मार्गाचं स्वप्न अजूनही अपूर्णच आहे.

( नक्की वाचा : ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला जानकरांचं तगडं आव्हान, कोण होणार खासदार? )
 

वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला?

जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत 64.75 टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल 5 टक्के जास्त म्हणजेच 69.18 टक्के मतदान वाढलंय. बदनापूरमध्ये 71.81, भोकरदन 74.26, जालना 60.90, पैठण 70.88, फुलंब्री 68.80 आणि सिल्लोड मतदारसंघात 68.87 टक्के मतदान झालंय. जरांगे फॅक्टरमुळे चर्चेत असलेल्या जालनाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्यानं कोण विजयी होणार याची उत्सुकता चांगलीच वाढलीय. 

Advertisement