प्रतापराव जाधव. शिवसेनेच्या शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदास. सलग चार वेळा त्यांनी बुलढाण्यातून विजय मिळवला आहे. शिंदे गटातील सध्याचे सर्वात जेष्ठ खासदार. प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरें ऐवजी शिंदेना साथ दिली. त्याचे बक्षिस त्यांना आता मिळत आहे. आधी लोकसभेची उमेदवारी, अटीतटीच्या लढतीत विजय आणि आता थेट केंद्रीय मंत्रीपदी वर्णी. त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्यासाठी आजचा क्षण हा राजकारणातील सर्वेच्च आनंदाचा क्षण असणार आहे. सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा थक्क करणारा आहे.
सरपंचपदापासून राजकारणाची सुरूवात
शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी मेहकरचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात मजल दरमजल पुढे जात गेले. ते मेहकर तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती झाले. पुढे जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकलेही. मेहकरचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केले. जिल्हा बँकेचे संचालक, उपाध्यक्ष अशी पदे त्यांना मिळत गेली. 1995 साली ते पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर सलग तिन वेळा ते विधानसभेचे आमदार होते. 1995 ते 2009 या काळात ते आमदार होते. युती काळात 1997 ते 1999 या काळात त्यांनी क्रीडा राज्यमंत्री म्हणूनही काम केले. पुढे 2009 ला जाधव यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दिल्ली गाठली.
पहिल्याच प्रयत्नात दिल्ली गाठली
2009 साली प्रतापराव जाधव यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. बुलढाण्यात त्यांची लढत त्यावेळचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या बरोबर झाली. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा 28 हजार मतांनी पराभव केला होता. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दिली गाठली. 2014 साली देशभरात मोदी लाट असल्यामुळे प्रतापराव जाधव यांचा पुन्हा एकदा मार्ग मोकळा झाला होता. तर 2019 मध्ये त्यांच्यासमोर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे उभे होते. यावेळी ही त्यांनी शिंगणेंना आस्मान दाखवत हॅटट्रिक केली. पुढे शिवसेनेत फुट पडली. त्यावेळी जाधव यांनी ठाकरे ऐवजी शिंदेंना साथ दिली. शिंदेंच्या शिवसेनेने त्यांना बुलढाण्यातून उमेदवारी दिली. ते अटीतटीच्या लढतीत विजयीही झाले.
आमदार आणि खासदारकीची हॅटट्रिक करणारे जाधव
प्रतापराव जाधव यांच्या नावावर एक नवे रेकॉर्ड आहे. त्यात त्यांनी आमदारकीची हॅटट्रिक केली आहे. तर खासदारकीतही सलग चार वेळा विजय मिळवला आहे. त्यांनी मेहकर विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदा 1995 ला विजय मिळवला. त्यानंतर 1999 आणि 2004 साली विजय मिळवत हॅटट्रिक केली. पुढे 2009 साली त्यांनी लोकसभा लढवली. त्यात विजय मिळवला. पुढे 2014, 2019 आणि आता 2024 ला विजय नोंदवला. विधानसभे सलग तिन वेळा विजयी. तर लोकसभेत सलग चार वेळा विजयी असा नवा रेकॉर्ड त्यांनी स्थापन केला आहे.
जाधव मंत्री होणार
सरपंचपदावर काम केलेल्या प्रतापराव जाधव आता केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेणार आहे. सर्व सामान्य कुटुंबातून आलेले प्रतापराव जाधव आता मोदींच्या मंत्रीमंडळात मंत्री असतील. शिंदेंच्या शिवसेनेत तेच सध्या सर्वात जेष्ठ खासदार आहेत. त्यांची ज्येष्ठता पाहात शिंदेंनीही त्यांनाच मंत्रीपदाची संधी दिली आहे. सुरूवातीपासूनच त्यांच्या नावाची मंत्री म्हणून चर्चा होती. शेवटी त्यांच्या नावावर शिक्कामोहर्तब करण्यात आले आहे. शिवसेनेच्या वाट्याला सध्या एक मंत्रीपद आले आहे.