- कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार आहेत
- महायुतीत शिवसेना शिंदे गट ६६ आणि भाजप ५६ जागांवर उमेदवारी देणार आहे
- राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडून ४२ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे
अमजद खान
महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपाची चर्चा सुरूच होती. त्यामुळे कुणाच्या वाट्याला किती जागा? कोणत्या जागा? याचं गणितच समोर येत नव्हतं. बरं त्या ही पेक्षा कुणाची आघाडी झाली आहे. कुणाची युती झाली आहे. कोण स्वबळावर लढणार आहे याचे ही चित्र स्पष्ट नव्हतं. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत काय स्थिती आहे हे ही समोर आलं आहे. इथं महायुती झाली आहे. पण महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. राष्ट्रवादीनेही वेगळी चुल मांडली आहे. तर दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जाते. खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे. युतीला इथं मोठ्या प्रमाणात विरोध असतानाही शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या युती झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागा आहेत. त्या पैकी महायुती शिवसेना शिंदे गट 66 जागा लढणार आहेत. तर भाजपच्या वाट्याला 56 जागा आल्या आहेत. त्यामुळे केडीएमसीमध्ये महायुती म्हणून भाजप शिवसेना लढणार आहेत. यात आता किती जण बंडखोरी करतात याकडे ही सर्वांचे लक्ष्य आहे.
महायुतीतून राष्ट्रवादी अजित पवार गट बाहेर पडला आहे. त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार गट इथं 42 जागा लढणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीची शकलं या ठिकाणी झाली आहेत. इथं महाविकास आघाडी झाली नाही. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र निवडणूक लढणार आहे. त्यात मनसे 54 जागांवर निवडणूक लढेल. तर ठाकरे गट 68 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यांचा थेट सामना महायुती सोबत असेल हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
तर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आली आहे. त्यांनी महायुती, ठाकरे बंधु यांना टक्कर देण्यासाठी तिसरी आघाडी उघडली आहे. या आघाडीत काँग्रेस 58 जागांवर निवडणूक लढेल. तर राष्ट्रवादी शरद पवार गट 35 जागा लढणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या लाट्याला 15 जागा आल्या आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत चौरंगी लढती होणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यात आता बंडखोर कुणाची डोकेदुखी वाढवणार हा खरा प्रश्न आहे. त्यांच्याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र ही निवडणूक अटीतटीची होणार हे स्पष्ट आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक
एकूण जागा 122
महायुती शिवसेना भाजप
- शिवसेना 66
- भाजपा 56
राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर
- अजित पवार गट 42 जागा लढणार
मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र
- मनसे 54
- ठाकरे गट 68
काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र
- काँग्रेस 58
- राष्ट्रवादी शरद पवार गट 35
- वंचित बहुजन आघाडी 15