Kalyan Dombivli Municipal Election 2026: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने मोठी आघाडी घेतली असून तब्बल 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधी पक्षातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचा हा विजय सुकर झाला आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून निवडणुकीपूर्वीच महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
विरोधकांचे रणांगणातून पाऊल मागे
निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणाऱ्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 5, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 6, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा 1 आणि काँग्रेसचे 2 उमेदवार सहभागी आहेत. या व्यतिरिक्त बहुजन समाज पक्षाचा 1, वंचित बहुजन आघाडीचा 1 आणि 8 अपक्ष उमेदवारांनी देखील आपली उमेदवारी मागे घेतली आहे. यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला.
( नक्की वाचा : महापालिकेत महायुतीला बुस्टर डोस; भाजपाचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी, वाचा सर्व नावं एका क्लिकवर )
प्रभागनिहाय बिनविरोध उमेदवारांची यादी
पॅनेल 11 अ मधून शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा किरण निचळ बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठाच्या दर्शना नीचळ, काँग्रेसच्या शालिनी ठमके, बसपाच्या ऐश्वर्या भोसले आणि अपक्ष सुशीला माळी यांनी माघार घेतली. तसेच पॅनेल 18 अ मध्ये भाजपाच्या रेखा राजन चौधरी यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने त्या बिनविरोध ठरल्या.
पॅनेल 19 मध्ये भाजपाच्या पूजा योगेश म्हात्रे, डॉ. सुनीता पाटील आणि साई शेलार यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या शिवसेना उबाठा आणि मनसेच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व
पॅनेल 23 मध्ये भाजपाचे दीपेश म्हात्रे, हर्षदा हृदयनाथ भोईर आणि जयेश म्हात्रे बिनविरोध निवडून आले आहेत. येथे शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. पॅनेल 24 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे रमेश म्हात्रे, वृषाली रणजीत जोशी आणि विश्वनाथ राणे यांनी विजय मिळवला, तर भाजपाच्या ज्योती पाटील देखील येथून बिनविरोध ठरल्या आहेत. पॅनेल 26 मध्ये भाजपाचे मुकुंद पेडणेकर, रंजना मितेश पेणकर आणि आसावरी नवरे यांनी वर्चस्व राखले आहे.
शेवटच्या टप्प्यातील महत्वपूर्ण माघार
पॅनेल 27 मधून भाजपाच्या मंदा पाटील आणि महेश पाटील बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या विरोधात मनसे उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. पॅनेल 28 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे हर्षल राजेश मोरे आणि ज्योती मराठे विजयी झाले आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पूजा बापट यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. तसेच पॅनेल 30 अ मध्ये भाजपाच्या रविना अमर माळी यांनी विजय मिळवला असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीचा विजय निश्चित झाला आहे.