विशाल पाटील, प्रतिनिधी
BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सध्या चांगलाच तापला आहे. महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र असले तरी, जमिनीवर मात्र चित्र काही वेगळेच पाहायला मिळत आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये प्रचार दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला. या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि वातावरण चांगलेच तापले.
विशेष म्हणजे, आजवर केवळ ठाकरे गटाकडून दिल्या जाणाऱ्या 50 खोके एकदम ओके अशा घोषणा चक्क भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेविरोधात दिल्या. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून युतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये राजकीय समीकरणे खूपच गुंतागुंतीची झाली आहे. महायुतीच्या जागावाटपात हा वॉर्ड शिंदेंच्या शिवसेनेला सुटला होता आणि त्यांनी येथून पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र, भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनीही भाजपचा एबी फॉर्म जोडून आपला उमेदवारी अर्ज भरला.
( नक्की वाचा : राज्यात सत्तेचा अजब खेळ, भाजपापाठोपाठ शिवसेनेचाही AIMIM बरोबर युती, परळीत अक्रितच घडलं! )
विशेष म्हणजे त्यांचा अर्ज वैध ठरल्याने शिंदे गटाला या ठिकाणी नाईलाजाने मैत्रीपूर्ण लढतीला होकार द्यावा लागला. आता प्रचार शिगेला पोहोचला असताना या दोन्ही महिला उमेदवारांचे कार्यकर्ते एकाच वेळी समोरासमोर आले. एका सोसायटीत भाजपचे तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असताना एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.
प्रचाराच्या उत्साहात भाजप कार्यकर्त्यांनी माईकवरून थेट 50 खोके एकदम ओके अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. आजवर या घोषणांनी ठाकरे गट शिंदे सेनेला डिवचत होता, पण आता स्वतःच्याच मित्रपक्षाने हा वार केल्याने शिंदे गटाचे कार्यकर्ते प्रचंड संतापले. त्यांनीही भाजपविरोधात घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मित्रपक्षानेच अशा प्रकारे हिणवल्याने युतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
संजय शिरसाट यांचा भाजपला इशारा
या संपूर्ण प्रकरणावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भाजपला इशारा देताना म्हटले की, ज्यांनी या घोषणा दिल्या त्यांनी आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले होते का? आमच्यामुळेच तुम्ही आज सत्तेत आहात हे विसरू नका. अशा घोषणा देणारे भाजपचे कोणते महारथी आहेत, हे तपासावे लागेल. फडणवीस या प्रकरणाची नक्कीच दखल घेतील, अशी अपेक्षा शिरसाट यांनी व्यक्त केली.
ठाकरे गटाचा खोचक टोला
भाजपनेच शिंदे गटाविरोधात 50 खोकेच्या घोषणा दिल्याने ठाकरे गटाला मात्र आयते कोलीत मिळाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले की, आम्ही तर आधीपासूनच या घोषणा देत होतो, पण आता भाजपचे कार्यकर्तेही त्याच घोषणा देऊ लागले आहेत. यातच सर्व काही आले.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कुठल्या कार्यकर्त्यांनी काय घोषणा दिल्या याची मला माहिती नाही, पण मुंबईत महायुती विकासाच्या मुद्द्यावर एकत्र लढत आहे आणि मुंबईचा पुढचा महापौर महायुतीचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
( नक्की वाचा : Latur News : विलासरावांच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा भाजपाला 'घरचा आहेर'; लातूरच्या सभेत नेमकं काय घडलं? )
विरोधी पक्षाचा फायदा होणार का?
एकीकडे महायुती म्हणून सत्तेत एकत्र राहायचे आणि दुसरीकडे निवडणुकीच्या मैदानात एकमेकांचे नुकसान होईल अशा घोषणा द्यायच्या, या प्रकारामुळे राजकीय विश्लेषक आश्चर्य व्यक्त करत आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या या अंतर्गत वादाचा आणि 50 खोके या घोषणेचा फायदा सरळ सरळ विरोधी पक्षाला म्हणजेच ठाकरे गट आणि काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांच्या या वादामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ शकते.