Kalyan Dombivli Municipal Election 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीतील मतदानापूर्वीच महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महायुतीच्या या मोठ्या आघाडीमुळे बॅकफुटवर गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारानेच आपल्या जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारीसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे खळबळ उडालीय. या आरोपांवर उद्धव ठाकरे काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
काय आहे प्रकरण?
ठाणे जिल्ह्यातील पक्षाचे जिल्हाप्रमुख तात्या माने यांच्यावर स्वपक्षाच्या उमेदवार वैशाली पोटे म्हात्रे यांनी पैशांच्या बदल्यात तिकीट वाटप केल्याचा घणाघाती आरोप केला आहे. वैशाली पोटे यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तात्या माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या आरोपामुळे निवडणुकीच्या ऐन धामधुमीत ठाकरे गटाची अडचण वाढली आहे.
( नक्की वाचा : महापालिकेत महायुतीला बुस्टर डोस; भाजपाचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी, वाचा सर्व नावं एका क्लिकवर )
मातोश्रीचा आदेश डावलल्याचा आरोप
वैशाली पोटे म्हात्रे यांनी आपला संताप व्यक्त करताना सांगितले की, त्यांना मातोश्रीवर बोलावून 5 तास चर्चा करण्यात आली होती. तिथे त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, असे असतानाही जिल्हाप्रमुख तात्या माने यांनी त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला.
पोटे यांचा आरोप आहे की, जे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहेत त्यांना डावलून केवळ पैसे घेऊन पळकुट्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. जिल्हाप्रमुखांनी तिकिटांचा बाजार मांडला असून त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मनसेसाठी जागा सोडल्याची चर्चा
कल्याण डोंबिवलीच्या 22 ब प्रभागामध्ये भाजपसमोर मनसे आणि ठाकरे गटाचे उमेदवार रिंगणात आहेत. चर्चा अशी आहे की, याठिकाणी मनसेला पाठिंबा देण्यासाठी किंवा जागा सोडण्यासाठी ठाकरे गटाच्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगण्यात आले होते. याच मुद्द्यावरून वैशाली पोटे आणि तात्या माने यांच्यातील वादाची ठिणगी पडली.
या दोघांमधील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्याची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे.
( नक्की वाचा : Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवलीत 'महायुती'चा धमाका! उमेदवारांच्या यादीत कुणाचं नाव? वाचा संपूर्ण यादी )
जिल्हाप्रमुख तात्या माने यांचे स्पष्टीकरण
दुसरीकडे, आपल्यावर होणारे सर्व आरोप जिल्हाप्रमुख तात्या माने यांनी फेटाळून लावले आहेत. निवडणुकीच्या काळात उमेदवारी देताना सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून जो आदेश येतो, त्यानुसारच अंतिम निर्णय घ्यावे लागतात.
राजकीय क्षेत्रात काम करताना अशा निर्णयामुळे काही लोक आनंदी होतात तर काही नाराज होतात, हे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला या दोन्ही बाजू सांभाळून घ्याव्या लागतात, असे म्हणत त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.