KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय वातावरणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. मनसेने शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवणारी ठाकरे यांची शिवसेना आता स्वतःच शिंदे गटाकडून प्रस्तावाच्या प्रतीक्षेत असल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. शिंदे गटाकडून सन्मानजनक प्रस्ताव आला, तर त्यांना पाठिंबा देण्याबाबत विचार केला जाईल, असे संकेत ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी दिले आहेत. या नव्या वळणामुळे कल्याण डोंबिवलीतील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.
ठाकरे गटाच्या गटनेत्याचा खळबळजनक दावा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बोरगावकर यांच्यासह 7 माजी नगरसेवकांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना बोरगावकर म्हणाले की, केडीएमसीमध्ये पाठिंबा देण्यासाठी भाजप नेते दीपेश म्हात्रे यांनी आमच्याशी संपर्क साधला होता. मात्र, अद्याप शिंदे यांच्या शिवसेनेकडून असा कोणताही अधिकृत प्रस्ताव आम्हाला मिळालेला नाही.
( नक्की वाचा : KDMC Election 2026 : ऐतिहासिक वचपा! चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंनी भाजपाचाच करेक्ट कार्यक्रम केला? )
आम्ही सध्या शिंदे गटाच्या प्रस्तावाची प्रतीक्षा करत आहोत. जर असा कोणताही सन्मानजनक प्रस्ताव समोर आला, तर त्यावर नक्कीच विचार केला जाईल आणि याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील.
मनसेवरील टीकेनंतर भूमिकेत बदल
विशेष म्हणजे मनसेने कल्याण डोंबिवलीत विकासाच्या मुद्द्यावर शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. या निर्णयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या मनसेच्या नगरसेवकांचा उल्लेख महाराष्ट्रद्रोही असा केला होता. इतकेच नाही तर राज ठाकरे यांनी अशा नगरसेवकांना पक्षातून काढून टाकावे, अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, आता त्याच ठाकरे गटाचे स्थानिक नेते शिंदे गटाच्या प्रस्तावावर विचार करण्याची भाषा करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
( नक्की वाचा : KDMC Election 2026 "शिंदे गट म्हणजे MIM"; मनसेच्या पाठिंब्यानंतर राऊतांचा संताप अनावर, राज ठाकरेंना दिला सल्ला )
संजय राऊत यांची शिंदे गटावर बोचरी टीका
या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी शिंदे गटाची तुलना एमआयएम या पक्षाशी केली असून, हा गट मराठी माणसांमधील एमआयएम असल्याचे म्हटले आहे. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राशी गद्दारी केली, त्यांच्याशी कोणतेही राजकीय संबंध ठेवता कामा नयेत, अशी भूमिका राऊत यांनी मांडली होती. काँग्रेसने ज्याप्रमाणे भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या आपल्या 12 नगरसेवकांना बाहेरचा रस्ता दाखवला, तशीच कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले होते.
स्थानिक समीकरणे आणि पक्षप्रमुखांच्या सूचना
उमेश बोरगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी चर्चा करताना सांगितले की, जर समोरून सन्मानजनक प्रस्ताव आला तर त्यावर विचार करा. या विधानामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गट स्थानिक पातळीवर एकत्र येणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांची प्रखर विरोधाची भूमिका आणि स्थानिक नगरसेवकांचे प्रस्तावाबाबतचे विधान यामुळे ठाकरे गटामध्येच दोन वेगवेगळे सूर उमटताना दिसत आहेत. आता शिवसेना काय प्रतिक्रिया देणार आणि खरोखरच असा प्रस्ताव पाठवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.