- कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला थोडक्यात बहुमत हुकल्यामुळे सत्ता स्थापन करणे आव्हानात्मक ठरले आहे
- शिवसेना शिंदे गट किंगमेकरच्या भूमिकेत असून काँग्रेस त्यांना आपल्या युतीत आणण्याचा प्रयत्न करत आहे
- कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसने 34, शिवसेना शिंदे गटाने 14 आणि भाजपने 26 जागा मिळाल्या आहेत
विशाल पुजारी
महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. काही ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काही ठिकाणी काठावरचे बहुमत आहे. तर काही ठिकाणी बहुमत थोडक्यात हुकले आहे. अशा स्थितीत काठावर असलेल्या महापालिकांमध्ये सत्तेचे गणित जुळवण्याच्या कसरती सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक शक्यता चाचपडून पाहील्या जात आहेत. अशीच एक महापालिका म्हणजे कोल्हापूर महापालिका आहे. इथं काँग्रेसला थोडक्यात सत्तेपासून दूर रहावं लागणार आहे. इथं शिवसेना शिंदे गट किंगमेकरच्या भूमीकेत आहे. अशा स्थितीत या गटाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे. तसे प्रयत्न काँग्रेस नेते सतेज पाटील करत असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येण्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. मुंबईत निवडून आलेले नगरसेवक वेगळे ठेवण्यात आले आहेत. महापौर पदावरून सध्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. याच महापौर पदाबाबत आमदार सतेज पाटील यांना कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेनेची युती होणार का असा प्रश्न विचारण्यात आलेला. या प्रश्नाला उत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी या बॅकडोअर चर्चा आहेत. या चर्चा जाहीर करू शकत नाही असं म्हणत उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराने सस्पेन्स मात्र वाढला आहे. त्यामुळे खरोखर काही पडद्या मागे काही चर्चा सुरू आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
पाटील यांच्या या उत्तरामुळे कोल्हापुरात काँग्रेस शिवसेना शिंदे गटाशी हात मिळवणी करू शकते अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने या निवडणुकीत महायुतीला एकहाती लढत दिली. मात्र थोडक्यात बहुमत हुकले. काँग्रेसला कोल्हापूर महापालिकेत 34 जागा जिंकता आल्या आहेत. काँग्रेस हा महापालिकेत सर्वात मोठा पक्ष बनला. ठाकरे गटाल केवळ एक जागा मिळाली. अशा महाविकास आघाडीला 35 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 26 आणि शिवसेना शिंदे गटाला 14 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे संख्या बळ 40 झाले आहेत.
शिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि जनसुराज्य पक्षाचा 1 नगरसेवक निवडून आला आहे. 81 नगरसेवक असलेल्या महापालिकेत 41 चे बहुमत आहे. अशा वेळी शेवटच्या क्षणी काही तरी चमत्कार होईल अशी अपेक्षा काँग्रेसकडून केली जात आहे. हाता-तोंडाशी आलेली सत्ता गेल्याचं दुख काँग्रेसला आहे. त्यामुळे काही नगरसेवक आपल्या गळाला लागणार का यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता कितीपत यश मिळतं हे पाहावं लागणार आहे. गेल्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रीत येत सत्ता स्थापन केली होती. तर शिवसेनेचा बाहेरून पाठिंबा होता.