Congress candidate from Mumbai North Lok Sabha seat : मुंबईतील सर्व 6 जागांवरील प्रमुख पक्षांचे उमेदवार ठरले आहेत. शिवसेनेनं मंगळवारी यामिनी जाधव (दक्षिण मुंबई) आणि रवींद्र वायकर (मुंबई उत्तर-पश्चिम) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यापाठोपाठ काँग्रेसनं उत्तर मुंबईतून उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. पाटील यांची केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी लढत होणार आहे.
उत्तर मुंबईतून भाजपाचे गोपाळ शेट्टी मागील दोन लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. यंदा भाजपानं शेट्टींच्या जागी पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनोद घोसाळकर इथून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. पण, काँग्रेसनं आपल्या कोट्यातील ही जागा कायम राखली असून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. .भूषण पाटील हे अनेक वर्षे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून मुंबई काँग्रेसचे माजी खजिनदार आहेत. मुंबईतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसंच क्रीडा क्षेत्रात ते सक्रीय आहेत.
काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत X हँडलवरुन ही घोषणा केलीय. भूषण पाटील यांच्यासह राज बब्बर (गुरगाव, हरयाणा) आणि आनंद शर्मा (कांगडा, हिमाचल प्रदेश) या प्रमुख नेत्यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केलीय.
मुबंईतील महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार
दक्षिण मुंबई - यामिनी जाधव (शिवसेना) विरुद्ध अरविंद सांवत (ठाकरे गट)
ईशान्य मुंबई- मिहीर कोटेजा (भाजप) विरुद्ध संजय दिना पाटील (ठाकरे गट)
दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)
उत्तर मुंबई - पियुष गोयल (भाजप) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)
उत्तर मध्य मुंबई - उज्जल निकम (भाजप) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)
उत्तर पश्चिम - रविंद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध अमोल कीर्तिकर (ठाकरे गट)