Lok Sabha Elections Results : सर्वाधिक जागा देणाऱ्या 2 मोठ्या राज्यात भाजपाला फटका का बसला?

Lok Sabha Elections 2024 Results : 2 मोठ्या राज्यात बसलेला फटका भाजपाच्या पिछेहाटीचं मुख्य कारण आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन मोठ्या राज्यात भाजपाला फटका बसलाय.
मुंबई:

Lok Sabha Elections Results 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झालीय. दुपारपर्यंत देशातील ट्रेंड समजला आहे. निवडणूक निकालांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला मोठं यश मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी सहज पंतप्रधान होतील असं भाकित व्यक्त करण्यात आलं होतं. पण, सध्याच्या ट्रेंडनुसार सर्व एक्झिट पोलचे अंदाज चुकल्याचं स्पष्ट झालंय. पंतप्रधान मोदींनी दिलेली 400 पार ची घोषणा तर दूरच आहे. पण, भाजपाला मागील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या 303 जागा जिंकणे देखील अवघड झालंय. 2 मोठ्या राज्यात बसलेला फटका भाजपाच्या पिछेहाटीचं मुख्य कारण आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. उत्तर प्रदेशात 80 तर महाराष्ट्रात 48 जागा आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं उत्तर प्रदेशात 80 पैकी 62 तर महाराष्ट्रात 25 जागा लढवूनही 23 जागी विजय मिळवला होता. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस या पंतप्रधान मोदींच्या दोन विश्वासू सहकाऱ्यांवर भाजपाची भिस्त होती. 

महाराष्ट्रात काय झालं? (Maharashtra Lok Sabha Elections Results 2024)

महाराष्ट्रात शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाशी भाजपची महायुती होती. भाजपानं यंदा 48 पैकी 28 जागा लढवल्या होत्या. मागील निवडणुकीपेक्षा तीन जागा जास्त लढवूनही भाजपाला अपेक्षित यश मिळणार नाही, हे ट्रे्ंडमधून स्पष्ट झालंय.

( नक्की वाचा : 2 निवडणुकांनंतर काँग्रेस सेंच्युरीच्या जवळ, कोणत्या राज्यांनी दिला राहुल गांधींना 'हात'? )
 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर झालेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत मतदारांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना असल्याचं स्पष्ट झालंय. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर तयार झालेल्या जातीय समीकरणाचाही भाजपला फटका बसल्याचं स्पष्ट झालंय. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपल्या पक्षाची पारंपरिक मतं भाजपकडं वळवण्यात अपयश आलं, हे देखील भाजपाच्या पिछेहाटीचं मुख्य कारण आहे. 

Advertisement

या सर्वांसोबतच विद्यमान खासदारांवरील नाराजी देखील भाजपाला भोवलीय. 2014 आणि 2019 मधील निवडणुकीत मोदी लाटेत भाजपाचे खासदार निवडून आले. या निवडणुकीत ही लाट महाराष्ट्रात ओसरली. त्यावेळी खासदारांची प्रतिमा, त्यांचं मतदारसंघातील काम याचा कस लागला. त्यात भाजपाचे विद्यमान खासदार अपयशी ठरले.

( नक्की वाचा : मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच भाजपाला 1 जागा, 'हे' कसं घडलं? )
 

उत्तर प्रदेशात काय झालं? (Uttar Pradesh Lok Sabha Elections Results 2024)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची फायरब्रँड नेते म्हणून देशभर प्रतिमा आहे. आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सूव्यवस्था सुधारण्याचं श्रेय देखील योगींना दिलं जातं. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वीच अयोध्येत श्रीराम मंदिरचं लोकार्पण झालं. त्यामुळे भाजपाची बाजू भक्कम मानली जात होती.

Advertisement

योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेवर राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे 'यूपी के लडके' भारी पडल्याचं समोर आलंय. मायावती यांचा बहुजन समाज पक्षाला या निवडणुकीत सपशेल अपयश आलंय. निवडणूक आयोगानं आत्तापर्यंत दिलेल्या माहितीनुसार एकाही मतदारसंघात मायावतींच्या बसपाचा उमेदवार आघाडीवर नाही. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या मतांमध्ये फूट पडण्यात मायावतींना अपयश आलं. त्याचा थेट फटका भाजपाला बसला. त्याचबरोबर राज्यातील मुस्लीम मतदारांनीही काँग्रेस-सपा युतीच्या बाजूनं कौल दिल्याचं स्पष्ट झालंय. त्याचाही भाजपाला फटका बसलाय.