देशातील हायप्रोफाईल अशा रायबरेली आणि अमेठी मतदारसंघांत येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसने दोन्ही जागांवर आपल्या उमेदवारांची अद्याप घोषणा केलेली नाही. भाजपकडून स्मृती इराणी यांनी अमेठीमधूल तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांचा पराभव करुन स्मृती इराणी यांनी लोकसभेत प्रवेश मिळवला होता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यंदाच्या निवडणुकीतही आपला विजय निश्चित आहे. मला फिकीर नाही की कोण समोर आहे. जो येईल तो हारणार. अमेठीमध्ये पुन्हा भाजप विजयी होईल, असा विश्वास स्मृती इराणी यांनी व्यक्त केला आहे. स्मृती इराणी यांनी NDTV ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली, त्यामध्ये त्या बोलत होत्या.
नक्की वाचा - मुंबई काँग्रेसमध्ये कलह, वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीला विरोध
रायबरेली आणि अमेठी काँग्रेसचे गड मानले जातात. अमेठीमध्ये मागच्या निवडणुकीत पराभव झालेले राहुल गांधी वायनाडमधून लोकसभेत गेले होते. यावेळी देखील ते वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 26 एप्रिल रोजी यासाठी वायनाडमध्ये मतदान पार पडलं आहे. मात्र राहुल गांधी अमेठीमधूनही निवडणूक लढणार का? हा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या सर्व शक्यतांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सस्पेन्स कायम ठेवला आहे.
काँग्रेसच्या या रणनितीबाबत बोलताना स्मृती इराणी यांनी म्हटलं की, त्यांची काय रणनिती सुरुये याबाबत माहिती नाही. मात्र अमेठी ही त्यांची पराभव झालेली जागा असल्याचं काँग्रेसला माहित आहे. त्यांना विजयाचा थोडा जरी विश्वास असता तर त्यांनी येथे उमेदवार जाहीर केला असता, असं इराणी यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Explainer: अश्लील व्हिडिओ स्कँडलमध्ये अडकले माजी पंतप्रधानांचे नातू, तक्रार दाखल होताच का सोडला देश?)
राहुल गांधी 15 वर्ष गायब होते
अमेठीमधून राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी कुणीही उमेदवार असो, मला त्याची पर्वा नाही. जो येईल त्याचा पराभव नक्की आहे. राहुल गांधी 15 वर्ष येथून खासदार होते, पूर्णवेळ ते गायब होते. मी फक्त 5 वर्ष येथून खासदार होते यामध्ये 2 वर्ष तर कोरोना महामारी होती, तरी मी येथे कामे केली आहेत, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं.
अमेठीतील नागरिकांचं प्रेम आणि विश्वास माझ्यासोबत
अमेठीतील नागरिकांच प्रेम आणि विश्वास माझ्यासोबत आहे. उन्हाचा पार वाढत असताना देखील लोक मोठ्या संख्येने जनसभांना पोहोचत आहेत. अमेठीतील जनतेचा मोदींच्या गॅरंटीवर विश्वास आहे. मोदींशिवाय त्यांच्या समस्या सोडवणारा कुणाही नाही, हे त्यांना माहित आहे. भाजपने 10 वर्षात जे काम केलं आहे, ते इतर कोणताही पक्ष करु शकत नाही, असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं.