भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपल्या देशात निवडणुका हा एक उत्सव असतो. या निवडणुकांमध्ये काही घटना अशा घडतात ज्याची इतिहासात नोंद होते. 2008 साली झालेल्या निवडणुकीतही असाच एक प्रकार घडला होता. त्यावेळी केनडी आणि हिटलर ही नावं चर्चेत आली होती. राष्ट्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा किस्सा शेअर केला आहे.
मेघालयात 2008 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा प्रकार घडला होता.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) तत्कालीन उमेदवार एडॉल्फ लू हिटलर मराक यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान पोलीस अधिक्षक जॉन एफ. केनडी यांनी अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात जॉन एफ केनडी यांनी केली एडॉल्फ हिटलरला अटक', अशी हेडलाईन प्रसिद्ध झाली. स्वाभाविकचं सर्वत्र ही बातमी चर्चेत होती. त्यानंतर काही दिवसांनी निवडणुकीचे निकाल घोषित झाले. त्यामध्ये हिटलर विजयी झाले होते.
निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा किस्सा शेअर केलाय. एडॉल्फ लू हिटलर मराक यांनी मागच्या वर्षी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
जॉन एफ. केनडी अमेरिकेचे 35 वे अध्यक्ष होते. ते 1961 ते 1963 साली त्यांची हत्या होईपर्यंत अध्यक्ष होते. तर एडॉल्फ हिटलर जर्मनीचा हुकुमशाह होता. त्यानं दुसऱ्या महायुद्धात पराभव अटळ असल्याचं लक्षात आल्यानंतर एप्रिल 1945 मध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.