Panchayat Samiti Result: पंचायत समितीत कुणाची बाजी? तुमच्या तालुक्यात कोणाची सत्ता? पाहा संपूर्ण निकाल

या निवडणुकीत अपक्ष आणि इतर नोंदणीकृत छोट्या पक्षांनीही अनेक ठिकाणी किंगमेकरची भूमिका बजावली आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 459 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे
  • अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 306 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आपली ताकद सिद्ध केली आहे
  • शिवसेना (शिंदे गट) ने 302 जागा मिळवल्या असून त्यांनी ग्रामीण भागातील सत्ता समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

जिल्हा परिषदे सोबतच पंचायत समिती निवडणुकांचा निकाल ही जाहीर झाला आहे. एकूण 12 जिल्ह्यांतील 1462 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत राज्याच्या राजकारणातील सर्वच प्रमुख आणि छोट्या पक्षांनी आपले नशीब आजमावले. या निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सत्तेचे समीकरण कोणाच्या बाजूने झुकले आहे, याचे स्पष्ट चित्र आता समोर आले आहे. या निकालात जिल्हा परिषदे प्रमाणे पंचायत समितीमध्ये ही भाजपने मुसंडी मारली आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर शिंदे सेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

पंचायत समितीतील पक्षनिहाय बलाबल 

राज्यातील एकूण 1462 पंचायत समिती जागांपैकी प्रत्येक पक्षाला मिळालेल्या जागा

  • * भारतीय जनता पक्ष (BJP): 459 जागा
  •  * राष्ट्रवादी काँग्रेस (NCP - अजित पवार गट): 306 जागा
  •  * शिवसेना (SS - एकनाथ शिंदे गट): 302 जागा
  •  * भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC): 97 जागा
  •  * शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे (SS-UBT): 89 जागा
  •  * राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार (NCP-SP): 46 जागा
  •  * अपक्ष (Independent): 31 जागा
  •  * मान्यताप्राप्त राज्य पक्ष (SEC): 17 जागा
  •  * इतर नोंदणीकृत राजकीय पक्ष: 36 जागा
  •  * महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS): 2 जागा
  •  * बहुजन समाज पार्टी (BSP), CPI आणि CPI(M): 0 जागा

विभागवार आणि जिल्हानिहाय सविस्तर विश्लेषण

1. कोकण विभाग (Konkan Division)
कोकणात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. पंचायत समितीचा विचार करता रायगड जिल्ह्यातील 118 जागा पैकी येथे शिवसेनेने सर्वाधिक 37 जागा जिंकल्या आहेत. भाजपला 32, राष्ट्रवादी काँग्रेसला 28, तर शिवसेना (UBT) ला 14 जागा मिळाल्या आहेत. इतर नोंदणीकृत पक्षांना 7 जागा मिळाल्या आहेत. तर  रत्नागिरी (112 जागा): या जिल्ह्यात शिवसेनेने 72 जागा जिंकून एकतर्फी वर्चस्व मिळवले आहे. भाजपला 14, राष्ट्रवादी काँग्रेसला 13, तर शिवसेना (UBT) ला 12 जागा मिळाल्या आहेत. मनसेला येथे 1 जागा मिळाली आहे. सिंधुदुर्ग (100 जागा): येथे भाजपने मुसंडी मारत 58 जागा काबीज केल्या आहेत. शिवसेनेला 28, शिवसेना (UBT) ला 7, तर अपक्षांना 7 जागा मिळाल्या आहेत.

2. पश्चिम महाराष्ट्र विभाग (Western Maharashtra)
हा विभाग नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील राहिला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली आहे. पुणे जिल्ह्यात पंचायत समितीच्या 146 जागा आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने 90 जागांसह एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपने 28, शिवसेनेने 12, शिवसेना (UBT) ने 10, तर राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ने 4 जागा जिंकल्या आहेत. अपक्षांना 2 जागा मिळाल्या आहेत. सातारा (130 जागा) येथे भाजपने 19, राष्ट्रवादी काँग्रेसने 18, आणि शिवसेनेने 15 जागा मिळवल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे, कराड पंचायत समितीच्या 24 जागांचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. सांगली (122 जागा): येथे चुरशीची लढत झाली असून भाजपने 34, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ने 27, काँग्रेसने 21, राष्ट्रवादी काँग्रेसने 20 आणि शिवसेनेने 19 जागा जिंकल्या आहेत.

नक्की वाचा - Zilla Parishad Result: कोणत्या जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता? पाहा संपूर्ण यादी, एका क्लिकवर

 सोलापूरात पंचायत समितीच्या 136 जागा आहेत. भाजपने येथे 73 जागांसह मोठे यश मिळवले आहे. काँग्रेसला 21, शिवसेनेला 13, राष्ट्रवादी काँग्रेसला 10, तर इतर नोंदणीकृत पक्षांना 16 जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत. कोल्हापूर मध्ये 136 जागा पंचायत समितीच्या आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस 33, भाजप 31, काँग्रेस 22 आणि शिवसेना 20 जागांवर विजयी झाली आहे. इतर नोंदणीकृत पक्षांना 25 जागा मिळाल्या असून अपक्षांना 2 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना (UBT) ला येथे 3 जागा मिळाल्या आहेत.

3. मराठवाडा विभाग (Marathwada Division)
मराठवाड्यात भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) मोठी मुसंडी मारल्याचे दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचायत समितीच्या 126 जागा होत्या. त्यात शिवसेनेने 47 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. भाजपला 38, काँग्रेसला 16, शिवसेना (UBT) ला 14, आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना 5 जागा मिळाल्या आहेत. तर धाराशिव (110 जागा) त्यात भाजपने 41 जागा जिंकल्या असून शिवसेनेला 31, शिवसेना (UBT) ला 19, आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 5, तर राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ला 1 जागा मिळाली आहे. परभणी (108 जागा) त्यात भाजपने 47 जागांसह आघाडी घेतली आहे. काँग्रेसला 33, शिवसेना (UBT) ला 9, आणि शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 6, अपक्षांना 4 आणि इतर नोंदणीकृत पक्षांना 2 जागा मिळाल्या आहेत.

Advertisement

नक्की वाचा - घराणेशाहीचा विजय असो! 'या' नेत्यांच्या नातेवाईकांची जिल्हा परिषदेत एन्ट्री, पाहा संपूर्ण लिस्ट

लातूर मध्ये पंचायत समितीच्या 118 जागा होत्या. त्यात भाजपने 44 जागा जिंकल्या असून काँग्रेसने 39 जागांसह कडवी झुंज दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 25 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ला 2, तर शिवसेना आणि शिवसेना (UBT) ला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. अपक्षांना येथे 4 जागा मिळाल्या आहेत. या निकालांवरून स्पष्ट होते की, महायुतीमधील भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक 459 जागांसह राज्याचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने प्रत्येकी 300 हून अधिक जागा जिंकून ग्रामीण भागात आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. विरोधी गटात काँग्रेसने 97 जागांसह आपली उपस्थिती दर्शवली आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 89 जागांवर विजय मिळवला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (SP) 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत अपक्ष आणि इतर नोंदणीकृत छोट्या पक्षांनीही अनेक ठिकाणी किंगमेकरची भूमिका बजावली असून, त्यांनी एकूण 67 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. मनसेला मात्र केवळ 2 जागांवर यश मिळाले आहे.