राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता सर्वांना वेध लागले आहेत ते मंत्रिपदाचे. मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी लॉबिंग करण्यास सुरूवात केली आहे. त्यात विधानसभेतील सर्वात वरिष्ठ सदस्य असलेल्या कालिदास कोळंबकर यांनी ही आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी मोजक्याच शब्दात पक्षाच्या वरिष्ठांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सलग नऊ वेळा विधानसभेत निवडून येण्याचं रेकॉर्ड कोळंबकर यांच्या नावावर आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सरकार स्थापन झाल्यानंतर हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला आहे. नव्या सरकारचे विशेष अधिवेशन 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात नव्या सदस्यांचा शपथविधी होईल. मंत्र्यांचा परिचय होईल. राज्यपालांचे अभिभाषण होईल. शिवाय नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड ही होईल. त्या आधी हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली गेली आहे.
ट्रेंडिंग बातमी - काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल, राज्यसभेत मोठा गदारोळ; भाजप आक्रमक
पक्षाने आपल्यावर हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ही तिन दिवसासाठीची जबाबदारी आहे. ती आपण सांभाळणार असल्याचे कालिदास कोळंबकर यांनी सांगितलं. मात्र त्यांनी आपल्या मनातली इच्छा यावेळी बोलून दाखवली. विधानसभेतील 288 आमदारांमध्ये सर्वात टॉप सिनिअर आमदार मीच आहे. सिनिअर असल्याने माझ्या भावनांचा पक्ष आदर करेल. पक्षाने माझी किंमत केली पाहीजे. त्यानुसार मला चांगलं पद दिलं पाहीजे असं आपलं मत असल्याचे कालिदास कोळंबकर म्हणाले. कोळबंकर यांनी या आधी नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद भूषवलं आहे. त्यानंतर त्यांना सतत मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे.
ट्रेंडिंग बातमी - पती- पत्नीने लेकीसह आयुष्य संपवलं; कारण ऐकून सगळेच सुन्न
कोळंबकर हे शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप अशा तिन पक्षाकडून निवडणूक लढले आहेत. त्यांनी प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला आहे. कोळंबकर हे नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर कोळंबकरांनीही राणेंना साथ दिली होती. शिवाय त्यावेळी आमदारकीचा राजीनामा देत पोटनिवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनीही निवडणूक जिंकली होती. पण त्यांना मंत्रिपदाने सतत हुलकावणी दिली. यावेळी तरी आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा आता कोळंबकरांना आहे. पक्षश्रेष्ठी त्यांची ही इच्छा पुर्ण करणार का हे आता पहावे लागेल.