- मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांना स्वबळावर बहुमत मिळालेले नाही
- शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले असून भाजपला सत्ता स्थापनेसाठी त्यांच्यावर अवलंबून रहावे लागणार आहे
- शिवसेना शिंदे गटाने मुंबई महापालिकेचा महापौर शिवसेनेचा हवा असल्याची मागणी केली आहे
मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबईकरांनी कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. भाजप हा 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण त्यांना स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेना शिंदे गटावर अवलंबून राहावे लागणार आहे. शिंदे सेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्या शिवाय भाजपला आपला महापौर बसवता येणार नाही हे स्पष्ट आहे. ही बाब शिवसेना शिंदे गटालाही माहित आहे. त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॅावर वाढली आहे. त्यातूनच आता शिवसेना शिंदे गटाचे मुंबईचा महापौर शिवसेनेचाच झाला पाहीजे अशी मागणी केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला मुंबईकरांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे. गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेवर सातत्याने शिवसेनेचा महापौर विराजमान झाला होता. हे पाहाता यावेळी ही शिवसेनेचाच महापौर व्हावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून होताना दिसत आहे. शिवाय यंदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. ही बाब पुढे करत मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेच्या महापौर असावा अशी आग्रही मागणी शिवसैनिक करत आहेत. बाळासाहेब आणि शिवसेना हे अतूट नाते आहे. अशा वेळी शिवसेना शिंदे गटाने भाजपवर गुगली टाकली आहे. त्यावर भाजपकडून काय प्रतिक्रीया येते हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
पण या निमित्ताने शिंदेसेनेने आमच्या शिवाय कुणाचा ही महापौर होणार नाही याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपचे जास्त नगरसेवक आहे. शिवाय ते नेहमी बाळासाहेबांचे नाव ही घेतात. बाळासाहेबांची खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं भाजपकडून वारंवार सांगितलं गेलं. त्यामुळे भाजपचे जास्त नगरसेवक निवडले आले तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली म्हणून शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर बसवावा अशी आग्रही मागणी शिवसैनिक करत आहेत. अशा स्थितीत भाजपचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. अनेक वर्षापासून मुंबईवर भाजपचा महापौर बसावा अशी पक्षाची इच्छा होती. पण तसं झालं नाही.
ती संधी 2026 च्या निवडणुकीनंतर निर्माण झाली आहे. पण भाजपला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे कोंडी झाली आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाकडून ही महापौरपदाची मागणी होत आहे. त्यात बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. या भावनिक खेळीत भाजप अडकणार का याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे. इतक्या वर्षानंतर आलेली संधी भाजप इतक्या सहजासहजी सोडेल असं वाटत नाही. अशात शिंदेंचे नगरसेवक फुटण्याची भिती ही व्यक्त केली जात आहे. त्यासाठी ठाकरे गटाने फिल्डींग लावल्याचं ही बोललं जात आहे. तर भाजपच शिंदेंचे नगरसेवक फोडेल असं ठाकरेंनी सांगितलं आहे. त्यामुळे महापौर कुणाचा याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.